दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी युनिट क्रमांक १५ येथे दीड वर्षांच्या मुलीवर झालेल्या हल्ल्यानंतर वनविभागाने रविवारी पहाटे अजून एका बिबट्याला जेरबंद केले. गेल्या सोमवारी बिबट्याच्या हल्ल्यात इतिका लोट ही दीड वर्षांची मुलगी मरण पावली. या घटनेनंतर आठवड्याभरात वनविभागाने दोन बिबट्यांना जेरबंद केले आहे. त्यापैकी बुधवारी पहाटे जेरबंद केलेल्या सी ५५ या बिबट्यानेच हल्ला केल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. हल्ल्याच्यावेळी सी ५५ सह त्याची आई बियंकाचाही युनिट क्रमांक १५ येथे वावर होता. त्यामुळे हल्ला नेमका कोणत्या बिबट्याने केला आहे, याबाबत अद्यापही अंतिम निर्णयापर्यंत वनविभाग पोहोचलेले नाही.
रविवारी सकाळी साडेपाच वाजता युनिट क्रमांक १५ येथे वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बिबट्या अडकला. या बिबट्याची ओळख अद्यापही पटलेली नाही. बिबट्याला तातडीने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. हा बिबट्या सी ५५ बिबट्याचा भाऊ सी ५६ असल्याची दाट शक्यता आहे. सोमवारच्या घटनेनंतर आरेतील कॅमेरा ट्रेपची पाहणी केली असता हल्ल्याच्या ठिकाणी सी ५५ चा वावर होता, असे वनाधिका-यांच्या लक्षात आले.
(हेही वाचा – वर्षानुवर्षे चलनी नोटांवर दिसणारा गांधींचा ‘हा’ फोटो नेमका आला तरी कुठून?)
या घटनेच्यावेळी सी ५५ सह त्याची आई बियंकाही युनिट क्रमांक १५ येथेच होती. बियंकाही ही पूर्ण वाढ झालेली मादी बिबट्या आहे. सी ५५ आणि सी ५६ या साडेतीन वर्षांच्या नर बिबट्यांसह अजून एका मादी बिबट्याची बियंका आई आहे. सोमवारच्या घटनाक्रमांत सी ५५ आणि बियंका युनिट क्रमांक १५ येथे होते. त्यामुळे रविवारी जेरबंद झालेल्या बिबट्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. मात्र याबाबतचा निर्णय रविवारी सायंकाळी किंवा सोमवारी सकाळी घेतला जाईल, अशी माहिती वनाधिका-यांनी दिली.
Join Our WhatsApp Community