कासवापाठोपाठ फ्लेमिंगोच्या सॅटलाईट टॅगिंगचा प्रयोग फसला

93

ऑलिव्ह रिडले कासवांपाठोपाठ फ्लेमिंगो पक्ष्याच्या शरीरावर लावलेल्या सॅटलाईट टॅगिंगलाही तंत्रज्ञान बिघाडाचा फटका बसला आहे. हिवाळ्यात ठाणे खाडी परिसराला भेट देणा-या फ्लेमिंगो पक्ष्यांच्या थव्यांचे आगमन आणि निर्गमनाचा मार्ग जाणून घेण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)च्या शास्त्रज्ञांनी सहा फ्लेमिंगो पक्ष्यांच्या शरीरावर सॅटलाईट टॅगिंग केले होते. यापैकी पाच फ्लेमिंगो पक्ष्यांनी ठाणे खाडी परिसरातून थेट गुजरातला पावसाळ्यात मुक्काम हलवला. मात्र एका फ्लेमिंगो पक्ष्याचा थांगपत्ता काही केल्या शास्त्रज्ञांना होत नाही आहे. अखेरिस संपर्क गमावलेल्या फ्लेमिंगो पक्ष्याच्या शरीरावरील सॅटलाईट टॅगिंगच्या यंत्रणेत सिग्नल बिघाड झाला असावा, असा अंदाज बीएनएचएसने व्यक्त केला.

( हेही वाचा : चर्नीरोड रेल्वे स्थानकाचा झोपडप्यांचा विळखा सुटला, ३२ झोपड्यांवर महापालिकेची कारवाई)

९०च्या दशकापासून ठाणे खाडी परिसराला हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी हिवाळ्यात येऊ लागले. या पक्ष्यांच्या आगमनामुळे तसेच पाणथळ जमिनीत त्यांचे प्रमुख अन्न बनलेल्या शेवाळामुळे त्यांच्या शरीराचा काही भाग गुलाबी झाला. ठाणे खाडी परिसराला गुलाबी रंगाची झालर आली. २०१५ साली वनविभागाने ठाणे खाडीचा काही परिसर ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केला. दरवर्षी न चुकता ठाणे खाडीला हिवाळ्यात भेट देणा-या फ्लेमिंगो पक्षी पावसाळा सुरु होताच हळूहळू ठाणे खाडी परिसर सोडतात. फ्लेमिंगो पक्ष्यांचा मूळ मुक्काम कोणता, ठाणे खाडीचा परिसर गाठायला आणि सोडताना पक्षी कोणता मार्ग निवडतात याचे रहस्य उलगडण्यासाठी पावसाळा संपत आला तरीही सॅटलाईट टॅगिंगसाठी सहा लेसर आणि ग्रेटर प्रजातीच्या फ्लेमिंगोंना शास्त्रज्ञांनी सॅटलाईट टॅगिंग केले. आता सप्टेंबर महिना संपत आला असल्याने ठाणे खाडी परिसरात एकही फ्लेमिंगो पक्षी सध्या दिसून येत नाही आहे, असे बीएनएचएसचे डॉ. बिभाष पांड्या म्हणाले.

जून अखेरिस सिग्नल यंत्रणेच्या नोंदीत सहापैकी पहिला सलीम नावाचा लेसर प्रजातीचा फ्लेमिंगो पक्षी ठाणे खाडीतून आकाशात उडाला. त्याने ठाणे खाडीतील यंदाचा मुक्काम पूर्ण केल्याचे सिग्नल यंत्रणेतून शास्त्रज्ञांना आढळले. सलीमपाठोपाठ हळूहळू हुमायून (लेसर प्रजातीचा फ्लेमिंगो), मॅकेन (ग्रेटर प्रजातीचा फ्लेमिंगो), लेस्टर (ग्रेटर प्रजातीचा फ्लेमिंगो), खैरलांजी (ग्रेटर प्रजातीचा फ्लेमिंगो) यांनीही ठाणे खाडी वेगवेगळ्या ठिकाणांहून सोडली. पाचही फ्लेमिंगो गुजरातला गेले. मात्र नवी मुंबई नावाच्या फ्लेमिंगो पक्ष्याबाबत शास्त्रज्ञांना माहिती मिळेना. अखेरिस, त्यांच्या सॅटलाईट टॅग मशीन यंत्रणेत सिग्नल बिघाड झाला असल्याचा बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

या तारखेला उडाले फ्लेमिंगो पक्षी

  • ३० जून – हुमायून
  • ६ जुलै – सलीम
  • १४ जुलै – मॅकेन
  • २१ जुलै – लेस्टर
  • २ ऑगस्ट – खैरलांजी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.