बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गुजरातहून आणलेल्या सिंहाच्या जोडीला मंगळवारी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पर्यायी पिंजऱ्यात पाठवण्यात आले. डी११, डी २२ अशा दोन वर्षांच्या सिंह-सिंहिणीच्या जोडीला दहा दिवसांपूर्वी गुजराहून मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सफारी पर्यटनाकरता तसेच उद्यानात सिंहाची संख्या वाढवण्यासाठी आणले गेले. मंगळवारी उद्यानात संपन्न झालेल्या कार्यक्रमात गुजरातहून अजून दोन सिंह येत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवासांत सफारीतील सिंहाची संख्या ४ पर्यंत पोहोचेल. नोव्हेंबर महिन्यात आणलेल्या सिंहांच्या जोडीला सफारीत नेमके कधी पाहता येईल, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिला.
( हेही वाचा : शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी होणार ‘या’ तारखेला!)
गेल्या कित्येक वर्षांपासून उद्यानातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात महसूल देणा-या वाघ आणि सिंह सफारीला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे. २०१५ साली तब्बल दहा वर्षानंतर वाघ सफारीत वाघाला मोकळे सोडले गेले. त्याचवेळी सिंह सफारीच्या विस्तारासाठी सफारीत सिंह फिरायला बंदी आणली गेली. कालांतराने सिंहासह वाघांनाही सफारीतील पर्यायी पिंज-यातून पर्यटकांना पाहावे लागत होते. पर्यटकांच्या तक्रारीमुळे वनाधिका-यांनाही मोठा मनःस्ताप सहन करावा लागत होता. उद्यानातील पिंज-यात रवींद्र आणि जेस्पा या दोन सिंहाचा मृत्यू झाल्यानंतर अखेरिस वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी पिंज-यातील सिंह-सिंहिणीच्या जोडीला पर्यायी पिंज-यात ठेवण्याची मंजुरी दिली. मंगळवारी सुधीर मुनगंटीवार यांनी वाघाटी प्रजनन केंद्राचे उद्घाटनही केले. तर वनग्रंथालयाचेही भूमिपूजन मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्यानात लवकरच वनसभागृह उभारले जाईल, अशीही घोषणा त्यांनी केली.