गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरील चारभट्टी पूलाजवळ शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास नर वाघाचा मृतदेह आढळला. रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याने वन्यप्रेमींनी जंगलातून जाणा-या रेल्वेकडून योग्य ती खबरदारी पाळली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. घटना घडल्यानंतर वनविभागाला माहिती न दिल्याबाबत वनविभागाने आक्षेप नोंदवला आहे. या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल, असे वनविभागाकडून सांगण्यात आले.
( हेही वाचा : पोलीस आयुक्तांच्या निवृत्तीच्या वाटेवर पोलिसांचे डोळे)
साधारणतः सहा वर्षांचा हा वाघ प्रामुख्याने भंडारा जिल्ह्यात गेल्या तीन-चार महिन्यांपासून होता. भंडारा, वडसा, अर्जूनी मोरेगाव या भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील भागात वाघाचा वावर दिसायचा. सीसीटीव्ही कॅमे-यात तो गेल्या काही काळापासून भंडा-यातच दिसून येत होता. ‘एलसी’ या नावाने त्याला संबोधले जायचे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात १० तारखेला सकाळी तो भंडा-यातच आढळून आला होता. आज सकाळी चोवीस तासानंतर त्याचा रेल्वेमार्गावर मृतदेह आढळला. शवविच्छेदनातील अहवालानुसार एलसीच्या डावीकडील मागच्या बाजूच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. कमरेवरही आणि तोंडावरही जखमा आढळल्या. अतिरक्तस्रावामुळेच वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गाचा वन्यप्राण्यांकडून जंगलात इतरत्र जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे वन्यप्राणी आढळल्यास रेल्वेचा वेग कमी करणे, हॉर्न वाजवणे अशा सूचना वनविभागाने रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. रेल्वेची वन्यप्राण्याला धडक लागल्यास तातडीने वनविभागाला कळवण्याच्या सूचनांचे पालन न झाल्याने वनविभागाने आता रेल्वेकडून चौकशी अहवाल मागवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या २४ तासांत गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावरून जाणा-या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक, संबंधित मोटरमन याची चौकशी केली जाईल, असेही वनविभागाकडून सांगण्यात आले.
सहा महिन्यापूर्वी वन्यप्राणी भूयारी मार्गावरील निर्णय प्रलंबित
गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर या अगोदरही वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला आहे. वाघ, बिबट्या, रानगवा, चितळ आदी वन्यप्राण्यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाला आहे. गोंदिया-चंद्रपूर रेल्वेमार्गावर आवश्यक ठिकाणी वन्यप्राण्यांना ये-जा करण्यासाठी भूयारी मार्ग तयार केले जावेत, यासाठीचा प्रस्ताव आम्ही वनविभाग आणि रेल्वे प्रशासनाला दिला आहे, असे गोंदियाचे मानद वन्यजीव रक्षक मुकुंद धुर्वे यांनी सांगितले. भूयारी मार्गाच्या ठिकाणांची पाहणी करताना प्रत्यक्षात रेल्वे अधिकारीही आमच्यासोबत होते. पाहणीनंतर ६५ ठिकाणी भूयारी मार्गांची गरज असल्याचे मत धुर्वे यांनी दिले.