ज्येष्ठ मराठी अभिनेत्री ईला भाटे यांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. सायबर भामट्याने मोबाईल फोन केवायसीच्या नावाखाली १ लाख ४८ हजार रुपये ऑनलाईन लाटले आहे. या प्रकरणी विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाणून घ्या काय आहे प्रकरण
ईला भाटे या ज्येष्ठ मराठी अभिनेत्री विलेपार्ले पूर्व येथे राहण्यास आहे. अभिनेत्री भाटे यांच्या पतीच्या मोबाईल क्रमांकावर एअरटेल कंपनीच्या नावाने केवायसी अपडेटसाठी मेसेज आला होता, त्यात केवायसी अपडेट न केल्यास सिम कार्ड बंद होऊ शकते, असे नमूद करण्यात आले होते व त्यात एक मोबाईल क्रमांक देण्यात आला होता. ईला भाटे यांनी त्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरच्या व्यक्तीने स्वतःचे नाव राजेश अग्रवाल असल्याचे सांगून तो एअरटेल कंपनीच्या कस्टमर सर्व्हिस मधून बोलत असल्याचे ईला भाटे यांना सांगितले. तुमच्या मोबाईल सिमचे केवायसी अपडेट करा नाहीतर सिम कार्ड बंद होईल असे त्याने सांगितले.
…आणि प्रकार उघडकीस आला
ईला भाटे यांनी त्याला केवायसी अपडेटसाठी काय करावे लागेल असे विचारले असता त्याने टिम व्हिवर व क्विक सपोर्ट हे अँप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी सांगितले. भाटे यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून अप्लिकेशन डाउनलोड केले व त्याने क्रेडिट कार्ड वरून १० रुपये भरण्यास सांगितले. भाटे यांनी पतीच्या क्रेडिट कार्डची माहिती भरून १० रुपये भरले. त्यानंतर त्यांना संशय येताच त्यांनी एअरटेल गॅलरीत जाऊन चौकशी केली असता आम्ही असाच मेसेज कधीच कुठल्या ग्राहकाला पाठवत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर भाटे यांनी आपली बँक गाठली त्या ठिकाणी चौकशी केली असता त्यांच्या पतीच्या क्रेडिट कार्ड वरून १ लाख आणि दुसऱ्यांदा ४८ हजार ७६५ रुपये ट्रांझेक्शन झाल्याचे सांगण्यात आले. ईला भाटे यांनी तात्काळ विलेपार्ले पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
Join Our WhatsApp Community