असानी चक्रीवादळ तीव्रता कमी करत असतानाच आज सायंकाळी आंध्र प्रदेशातील मछलीपूर आणि नरसापूर येथील किनारपट्टीवर धडकले. हे वादळ किना-याला स्पर्श करुन जाईल, मात्र धडकणार नाही, असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज मात्र हुकला. राज्यातही दक्षिण कोकण आणि नजीकच्या भागांत पावसाच्या अंदाजालाही वादळाने हुलकावणी दिली.
( हेही वाचा : स्मार्टफोनवर कॉल रेकॉर्ड करण्याला येणार मर्यादा )
राज्यात आज केवळ ढगाळ वातावरणच दिसून आले. सकाळपासूनच दक्षिण कोकणावर ढगांचे आच्छादन दिसून आले. मात्र पाऊस पडला नाही. तर दुसरीकडे आंध्रप्रदेशच्या मछलीपूरम आणि नरसापूर येथील किनारपट्टीदरम्यान असानी चक्रीवादळ धडकल्याची माहिती भारतीय वेधशाळेचे महासंचालक डॉ एम. मोहापात्रा यांनी दिली. यावेळी वादळातील वारे ७५ किलोमीटर ताशी वेगाने वाहत होते. वादळाची तीव्रता कमी झाली आहे. १२ मे सकाळपर्यंत वादळाची तीव्रता अजून कमी होईल. मात्र पूर्वीच्या अंदाजाप्रमाणे न्यूनतम क्षेत्र बंगालच्या उपसागरात परतत आहे की, राज्यात पुन्हा येत आहे, याची माहिती घेतली जात असल्याचे स्पष्टीकरण डॉ मोहापात्रा यांनी दिले. मात्र या न्यूनतम क्षेत्रातील बाष्पाच्या प्रमाणामुळे दक्षिण कोकणात शुक्रवारपर्यंत पाऊस राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
विदर्भातील उष्णतेच्या लाटेचा मुक्काम वाढला
देशात वायव्य भागांतील कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव अद्याप विदर्भात आहे. परिणामी मे महिन्याच्या सुरुवातीपासून सातत्याने सुरु असलेल्या उष्णतेच्या लाटांचा मारा १५ मे पर्यंत विदर्भात राहील, असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. विदर्भासह राज्यातील उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही भागातही उष्णतेची लाट आहे. मात्र १२ मे रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट दिसणार नाही, असा अंदाजही भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
Join Our WhatsApp Community