गौताळा अभयारण्याला मोकाट जनावरांचा, पर्यटकांचा धोका

औरंगाबाद येथील गौताळा अभयारण्यात वाढत्या पर्यटकांच्या आणि जनावरांच्या वावरामुळे वनसंपदा धोक्यात आली आहे. अभयारण्यातील दुर्मिळ वनस्पतींच्या अस्तित्वाला धोका पोहोचला असल्याची भीती वनस्पती अभ्यासक व वन्यप्रेमींनी केली असून, वनविभागाने तातडीने पर्यटकांच्या संख्येला लगाम घालावा, तसेच पाळीव प्राण्यांना अभयारण्यात प्रवेश बंदी करावी, अशी मागणी केली आहे.

वनस्पतींच्या संरक्षणाबाबत प्रशासन गंभीर नाही

दीपकाडी, भुईचक्र, कंदीलपुष्प, रानसुरण, मुसळी, कर्णफूल, अर्कपुष्पी इत्यादी वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात आल्याची माहिती वनस्पती अभ्यासक मिलिंद गिरधारी यांनी दिली. अर्कपुष्पी ही नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ही बाब गौताळा अभयारण्यात आयोजित अभ्यास दौ-यात आम्हाला लक्षात आली. जागतिक दर्जाच्या कास पठाराप्रमाणेच गौताळा अभयारण्यात दीपकाडी ही वनस्पती आढळते. या वनस्पतींच्या संरक्षणाबाबत प्रशासन गंभीर नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

पर्यटकांच्या वर्तवणुकीला लगाम नसल्याने अभयारण्यातील जैवविविधता धोक्यात आली आहे. त्यासाठी संवर्धनात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

– मिलिंद गिरधारी, वनस्पती अभ्यासक

अभ्यास दौ-यातील निरीक्षण 

  • पर्यटक वाहने माळरानावर थेट पार्क करतात.
  • माळरानावर मद्यपींचा कार्यक्रम रंगतो.  पार्ट्यांचे आयोजन होते.
  • अभयारण्यात प्लास्टीक कच-याचे प्रदूषण वाढत आहे.
  • बेशिस्त पर्यटकांकडून वनस्पती अक्षरशः पायदळी तुडवल्या जात आहेत.
  • गावक-यांकडून आपली जनावरे माळरानावर मोकाट चरायला सोडली जातात.

 

अस्तित्वावरील संकट

सध्याच्या मोसमात वनस्पती फळधारणा करुन बिजप्रसार करतात. प्रसारित होणारे बीज अंकुरित होऊन नवी रोपे तयार होण्याच्या ऋतुमानात त्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचला आहे.

अभयारण्यात पर्यटकांच्या वर्तवणुकीत नियमितता येण्यासाठी आम्ही मनुष्यबळ तैनात केले आहे. अवैध चराई बंद करण्यासाठी कारवाया केल्या जात आहेत.

– डॉ. राजेंद्र नाळे, साहाय्यक वनसंरक्षक, गौताळा अभयारण्य, औरंगाबाद

तज्ज्ञांना भीती

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील वनसंपदेएवढेच मराठवाड्यातील गौताळा अभयारण्य हे जैवविविधतेने नटलेले अभयारण्य म्हणून ओळखले जाते. कास पठारावर आढळणा-या विविध वनस्पती येथे आढळतात. गौताळा अभयारण्याचे महत्त्व लक्षात घेता येथील वनसंपदेचे संवर्धन होण्याऐवजी पर्यटकांची संख्या वाढवून केवळ महसूल वाढवणे, रस्त्याचे विनाकारण रुंदीकरण करणे या गोष्टीकडे प्रशासनाचे लक्ष असल्याबाबत औरंगाबादचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी खेद व्यक्त केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here