भारत-नेपाळ रेल्वेचे काय आहे कोकण रेल्वे कनेक्शन?

129

भारत सरकार आणि नेपाळ सरकारने भारत-नेपाळ संबंध मजबूत करण्यासाठी, व्यापार आणि वाणिज्य व्यवहार वाढविण्याच्या दृष्टीने जयनगर (बिहार, भारत) आणि कुर्था (नेपाळ) या मार्गावर गेल्या २ एप्रिलपासून रेल्वे सेवा सुरू केली आहे. या सेवेचे परिचालन कोकण रेल्वेतर्फे केले जात आहे. कोकण रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

( हेही वाचा : एसटी सुरु करा, नाहीतर खुर्ची खाली करा! शाळकरी मुलाची आर्त हाक )

नेपाळ सरकारने नेपाळ रेल्वे कंपनी लिमिटेडची स्थापना केली आहे. या कंपनीतर्फे जयनगर-कुर्था विभागातील रेल्वे सेवा आणि रेल्वे प्रणालीचे संचालन आणि देखभाल केली जाणार आहे. कंपनीने कोकण रेल्वेच्या मदतीने या मार्गावरील परिचालन सुरू केले आहे.

कोकण रेल्वेच्या मदतीने परिचालन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सेवेचे उद्घाटन केले. परिचालनाचा भाग म्हणून कोकण रेल्वेने नेपाळ रेल्वेला पाच डीएमयू डबे असलेल्या दोन गाड्या दिल्या आहेत. सुरुवातीला याच दोन गाड्या त्या मार्गावर धावणार आहेत. हे डबे चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार झाले आहेत. या डब्यात अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. प्रत्येक गाडीत एक वातानुकूलित डबा असेल. नेपाळ सरकारने नेपाळच्या राष्ट्रीय ध्वजावर आधारित या गाडीची रंगसंगती तयार केली आहे. नेपाळ रेल्वे कंपनीने कोकण रेल्वेशी एक वर्षाच्या कालावधीसाठी परिचालन आणि देखभाल-दुरुस्तीबाबत करार केला आहे. नेपाळ रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. त्याकरिता २६ तज्ज्ञ मनुष्यबळ आणि किमान उपकरणे कोकण रेल्वे पुरवेल. रेल्वे परिचालनासाठी मूलभूत प्रणाली तयार करेल आणि ट्रॅक आणि सिग्नलिंगच्या देखभालीसाठी तांत्रिक सहाय्य प्रदान करेल. या रेल्वेसेवेमुळे मजबूत रेल्वे व्यवस्था तयार करायला तसेच दोन्ही देशांमधील संबंध दृढ व्हायला मदत होणार आहे.

दोन देशांना जोडणाऱ्या या महत्त्वपूर्ण घडामोडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी कोकण रेल्वेला मिळाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.