बेपत्ता मुलांच्या शोधासाठी “ऑपरेशन री- युनायट”

103

९ वर्षांपासून बेपत्ता असलेली मुलगी सापडल्यानंतर मुंबई पोलिसांकडून अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या १८ वर्षांखालील मुलांचा शोध घेण्यासाठी “ऑपरेशन री- युनायट” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. महिनाभर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी नागरिकांची मदत घेण्यात येणार आहे.

( हेही वाचा : राष्ट्रीय सणाला साजेसा पेहराव करा; एसटी कर्मचाऱ्यांना निर्देश )

अंधेरी येथे राहणारी रेश्मा (काल्पनिक नाव) ही मुलगी नऊ वर्षांपूर्वी बेपत्ता झाली. बेपत्ता झाली त्या वेळी तिचे वय पाच वर्षे होते. बेपत्ता होऊन ९ वर्षे उलटल्यावर, ती कुठे आहे, काय करते, तिचे काय झाले असेल याबाबत काहीही माहिती नव्हती. ती परत येईल किंवा सापडेल ही आशा तिच्या कुटुंबांनी देखील सोडली होती.

“ऑपरेशन री- युनायट”

मात्र डी.एन. नगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस अमलदाराच्या चिकाटीने रेश्मा ९ वर्षांनी अंधेरीतच सापडली. हरवलेली आपली मुलगी तब्बल ९ वर्षांनी सापडल्याचा आनंद रेश्माच्या कुटुंबांना झाला. याची दखल स्वतः पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी घेतली आणि अनेक वर्षांपासून हरवलेल्या अल्पवयीन मुलाच्या शोधासाठी “ऑपरेशन री- युनायट” हा उपक्रम प्रत्येक पोलीस ठाण्यात राबविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर दरम्यान एक महिना “ऑपरेशन री- युनायट” या उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील हरविलेल्या १८वयोगटाखालील मुलामुलींचा या उपक्रमादरम्यान शोध घेण्यात येणार आहे. महिनाभर चालणाऱ्या उपक्रमात नागरिकांची मदत घेतली जाणार आहे.

पोलिसांकडून आवाहन 

पोलिसांनी मुंबईकरांना विनंती केली आहे की, त्यांना आजूबाजूला अशी कोणतीही मुलं दिसली ज्यांच्यावर त्यांना बळजबरी करून विशिष्ट ठिकाणी वास्तव्य किंवा काम करत असल्याचा संशय आहे, असे कोणतेही मूल दिसल्यास १०० किंवा १०९८ वर कॉल करून कळवा, विशेषत: बस स्टँड, रेल्वे स्टेशन, धार्मिक स्थळे, रेस्टॉरंट किंवा घरगुती कामात अशा मुलांना गुंतवलेले आढळल्यास त्वरीत स्थानिक पोलीस ठाणे अथवा मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करून कळवा असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. त्याचबरोबर www.trackthemissingchild.gov.in या संकेतस्थळावर हरवलेल्या मुलांची छायाचित्रे अपलोड केलेली आहेत, हरवलेल्या मुलांशी त्यांचा चेहरा जुळतोय का ते पाहण्याची विनंती मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.