महाराष्ट्र पर्यटन संचालनालयमार्फत ज्येष्ठ नागरिकांकरिता गणेश दर्शनाच्या विशेष सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही सहल मुंबई, ठाणे, पुणे, आणि नागपूर या प्रमुख शहारांमध्ये आयोजित करण्यात आली असून दिनांक १, २ आणि ५ ते ७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ठाणे शहरातील तलावपाळी (घंटाळी रोड) आणि वाघबीळ (घोडबंदर रोड) या ठिकाणांहून सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत दररोज दोन बसेस सुटणार असल्याची माहिती प्रादेशिक पर्यटन विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी दिली.
ज्येष्ठ नागरिकांसाठी गणपती दर्शन सहल
पर्यटन संचालनालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या या विशेष सहलीकरिता नोंदणी करण्यासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या. प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य या तत्वावर इच्छुकांची निवड करण्यात येणार असून वर नमूद संकेतस्थळावर गुगल फॉर्ममध्ये माहिती भरल्यानंतर या माहितीची छाननी झाल्यावर रक्कम 75 रुपये भरण्यासाठी एक QR कोड आपणास पाठवला जाईल. सदर रक्कम भरल्यानंतर आपल्याला भरलेल्या शुल्काचा स्क्रीनशॉट पाठवावा लागेल, जो पेंडाल टूरची तुमची पावती देखील मानली जाईल. एका सहलीत जास्तीत जास्त 25 ते 30 वरिष्ठ नागरिकांचा समावेश असणार आहे. अधिक माहितीसाठी 9029581601 किंवा 7030780802 क्रमांकावर संपर्क साधावा.
( हेही वाचा : गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कोकणवासीय सज्ज)
ठाणे शहारातील गांधीनगर येथील शिवसमर्थ मित्र मंडळ, जय भवानी नगर येथील सार्वजनिक उत्सव मंडळ, किसन नगर-3 येथील जनजागृती मित्र मंडळ तसेच किसन नगर-3 मधील सूर्यउदय मित्र मंडळ, खेवरा सर्कल येथील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, खोपट येथील पंचशील सार्वजनिक मंडळ या नामांकित गणपती मंडळांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. या सहलीत VIP दर्शन, AC बसमधून प्रवास, अल्पोपहार व पाणी बॉटल, टूर गाईड, आरोग्य सेवक (प्रथमोपचार किट्ससह) इत्यादी सुविधा देण्यात येतील. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन प्रादेशिक पर्यटन कार्यालय कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे यांनी केले आहे.
Join Our WhatsApp Community