विश्व मराठी परिषदे तर्फे २९ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२२ दरम्यान प्रभानवल्ली ते धूतपापेश्वर (रत्नागिरी जिल्हा) अशी ‘साहित्य संस्कृती जागर परिक्रमा’ आयोजित करणयात आली आहे. या परिक्रमेची संकल्पना संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक क्षितिज पाटुकले यांची असून सहा दिवस चालणाऱ्या या नि:शुल्क परिक्रमेमध्ये सामील होण्यासाठी राज्यभरातील युवक –युवतींना परिषदेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
परिक्रमेची सुरवात ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारा सुभा प्रभानवल्ली पासून होणार असून पुढे खोरनिनको येथील मुचकुंदी नदीवरील धरण, बल्लाळेश्वर मंदिर, शिवकालीन गढी, वेरवली, लांजा, ओणी, राजापूरची गंगा, उन्हाळे येथील गरम पाण्याचे झरे, कातळशिल्पे, इंग्रजांच्या वखारीचे अवशेष इत्यादी स्थळांना भेटी देत प्राचीन धूतपापेश्वर मंदिर राजापूर येथे समाप्त होणार आहे. लांजा आणि राजापूर तालुक्यातील अनेक मान्यवर संस्था या उपक्रमात सहभागी होणार आहेत, अशी माहिती विश्व मराठी परिषदेचे संस्थापक संचालक श्री. अनिल कुलकर्णी यांनी दिली.
संस्कृती कलांविषयी ग्रामस्थ करणार मार्गदर्शन
परिक्रमेदरम्यान रोज सुमारे १२ ते १५ किलोमीटर अंतर चालण्याचा हा उपक्रम असून, राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे, ज्येष्ठ कवी म.भा.चव्हाण, लेखिका नीलिमा बोरवणकर, असे नामवंत साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकार युवकांच्या बरोबर असतील. त्यांच्याशी वैचारिक गप्पा, मंथन करण्याबरोबरच निवासाच्या ठिकाणी गावातील ग्रामस्थ, शेतकरी, प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याबरोबर विचारांचे, अनुभवांचे आदान प्रदान होईल. ग्रामीण खेळ आणि कलांचे सादरीकरण तसेच तेथील संस्कृती इतिहास याविषयी मार्गदर्शन या ग्रामस्थ लोकांकडून केले जाणार आहे.
( हेही वाचा: नवरात्रीनिमित्त बेस्टची मुंबईकरांसाठी खास ऑफर; 19 रुपयांत करू शकता 10 बसफेऱ्या; असा घ्या लाभ )
‘या’ संकेतस्थळावर करा नोंदणी
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून युवक युवतींना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन परिषदेने केले असून, इच्छुक युवक युवतींनी https://www.vishwamarathiparishad.org/ssjparikrama या संकेतस्थळावर वर नोंदणी करावी.
त्यातून सर्व जिल्ह्यांमधून १२५ युवक युवतींची परिक्रमेसाठी निवड केली जाणार आहे. ही परिक्रमा पूर्णपणे नि:शुल्क असून यामध्ये निवास व भोजनाची व्यवस्था परिषदेतर्फे केली असेल अशी माहिती या उपक्रमाच्या संयोजक सौ.स्वाती यादव यांनी दिली. अधिक माहितीसाठी अपूर्वा राऊत (९३०९४६२६२७) आणि स्वाती यादव (९६७३९९८६००) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन परिषदेतर्फे करण्यात आले आहे.