विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

140

पत्रकार, साहित्यिक आणि संगीत नाटककार असलेल्या विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 4 जानेवारीपासून मुंबईसह राज्यभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन विद्याधर गोखले संगीत- नाट्य प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. यावेळी गोखले यांच्या 7 संगीत नाटकांच्या पुस्तकांचा संचही विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. विद्याधर गोखले यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाची ओळख नव्या पिढीला व्हावी, तसेच जुन्या लोकांना आनंद घेता यावा, म्हणून गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा शुभारंभ बुधवार, 4 जानेवारीपासून ‘एकाच दिवशी, एकाच वेळी’ या अनोख्या संकल्पनेतून सादर केला जाणार आहे.

मुंबईतील शिवाजी मंदिर, दादर येथे 4 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 6:30 वाजता ‘विद्याधर गोखले’ यांच्या नाटकातील रागदारी बंदिशींचा कार्यक्रम ‘बसंत की बहार’ सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात पंडित विश्वनाथ कान्हेरे, विदुषी श्रुती सडोलिकर काटकर, पंडित राम देशपांडे, पंडित सुरेश बापट, ज्ञानेश पेंढारकर, मैत्रेयी राॅय दादरकर आणि धनंजय पुराणिक इत्यादी नामवंत कलाकार सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन शुभदा दादरकर यांचे आहे. आयोजित केलेले सर्व कार्यक्रम विनामुल्य ठेवण्यात आले आहेत.

( हेही वाचा: भारतीयांना ‘या’ देशात व्हिसा फ्री एन्ट्री बंद! १ जानेवारी २०२३ पासून नवे नियम )

वेगवेगळ्या केंद्रांवर आयोजित केलेले कार्यक्रम

  • जय शंकरा विद्याधरा, विद्याधर भक्तीगीतगंगा, प्रेयसी ते परमेश्वर इत्यादी लोकप्रिय गाजलेले कार्यक्रम
  • विद्याधर गोखले यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वातील गुणवैशिष्ट्ये अधोरेखित करणारा संगीतमय कार्यक्रम ‘अष्टपैलू विद्याधर’
  • ‘रंगला श्रीहरी’ हा स्मृति तळपदे यांचे नृत्य- दिग्दर्शन लाभलेला संगीत नाटकांतील श्रीकृष्ण गीतांचा नृत्यमय संगीत कार्यक्रम
  • विद्याधर गोखले लिखित ‘फुलवा मधूर बहार’ हे संगीत बालनाट्य वर्षा भावे यांच्या ‘कलांगण’ या संस्थेमार्फत सादर करण्यात येणार आहे.
  • या कार्यक्रमांच्या बरोबरीने विद्याधर गोखले लिखित काही संगीत नाटकांचे प्रयोग वर्षभर सादर केले जाणार आहेत.
  • तसेच, या व्यतिरिक्त वर्षभर प्रत्येक रविवारी सकाळी 9:30 नाट्यगीतरंगच्या यूट्यूब चॅनलवर विद्याधर गोखले यांनी लिहिलेले अग्रलेख, कविता इत्यादींचे नामवंत कलाकारांनी केलेले अभिवाचन आणि गोखलेंच्या सहवासातील व्यक्तींनी सांगितलेल्या आठवणी सादर होणार आहेत.
  • तसेच, या जन्मशताब्दी वर्षाची सांगता संगीत नाटकांच्या महोत्सवाने होणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.