७० व्या मजल्यावरून सिमेंटचा ठोकळा डोक्यात पडल्याने मजूराचा मृत्यू

137
मालाडमधील ‘ओरिस सेनेनिटी टॉवर्स’ या ७० व्या मजल्यावरून सिमेंटचा ठोकळा पडून ओसामा बिन लादेन या मजुराचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
मालाड पश्चिमेतील काचपाडा परिसरात ओरिस सेनेनिटी टॉवर्स या ७० मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ओसामा बिन लादेन अब्दुल कलाम आझाद (२१) हा मजूर त्या ठिकाणी बांधकाम साईडवर काम करत होता. सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ओसामा बिन लादेन हा पहिल्या मजल्यावर लिफ्टच्या भिंतीचे बांधकाम करत होता. अचानक ७०व्या मजल्यावरून सिमेंटचा ठोकळा ओसामाच्या डोक्यात पडला त्यात तो गंभीर जखमी झाला.
इतर मजुरांनी त्याला तत्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली असता त्या ठिकाणी कामगाराच्या सुरक्षेसाठी कंत्राटदार, बांधकाम व्यवसायिक यांनी कुठलीही उपाययोजना केली नसल्याचे आढळून आले. ओसामा बिन लादेन या मजुराचा मृत्यू हा कंत्राटदार आणि इतरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी कंत्राटदार आणि इतरांविरुद्ध निष्काळजीपणा आणि मृत्यूस जवाबदार असल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.