मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत असताना ओसरगाव टोल नाका सुरू करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक २७ मे पासून ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरु करण्यात येणार असल्याची माहिती टोल वसुली करणाऱ्या एम. डी. करीमुनिसा कंपनीच्या सूत्रांनी दिली. मात्र २६ मे रोजी याची प्रायोगिक चाचणी घेत असताना टोलनाक्यावर वाहन चालक आणि वसुली करणाऱ्यांत शाब्दिक चकमकी उडाल्या.
स्थानिकांना मासिक पास
राष्ट्रीय महामार्ग ६६ ची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत. मात्र असे असताना ओसरगाव टोलनाक्यावरून टोलवसुली सुरू करण्यात येणार आहे. याबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. टोल नाक्याच्या परिसरापासून वीस किलोमीटर परिघामध्ये येणाऱ्या वाहनांना मासिक ३१५ रुपयाचा पास देण्यात येणार आहे. त्या व्यतिरिक्त इतर वाहनांना टोल भरावा लागणार आहे. दुचाकी व तीनचाकी गाड्यांना टोल मधून सूट देण्यात आली आहे. तसेच फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे या टोल वसुलीबाबत सिंधुदुर्गवासी पुढे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Join Our WhatsApp Community