भारताच्या शेजारील देश श्रीलंकेत आता आर्थिक संकटामुळे हाहाकार माजला आहे. श्रीलंकेतील आर्थिक संकट आता भयावह रूप धारण करत असून लोकांच्या नाराजीचे रुपांतर संतापात होताना दिसत आहे. 31 एप्रिलच्या रात्री उशिरा शेकडो संतप्त लोक रस्त्यावर उतरले आणि राष्ट्रपती गोटाभाया राजपक्षे यांच्या निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रपतींचा निषेध त्यांनी केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्ये वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी टास्क फोर्सला पाचारण करावे लागले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला आणि राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची मागणी केली.
जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर
देशभरात पेट्रोल-डिझेलसह घरगुती गॅसच्या वाढत्या किमतीने सामान्य नागरिकांचे जगणं कठीण केले आहे. तर असाही एक देश आहे, ज्या ठिकाणी साखर तब्बल 290 रूपये तर तांदूळ 500 रुपये किलोने विकला जात आहे आणि तो देश आहे श्रीलंका. श्रीलंका आणि पाकिस्तानची अर्थव्यवस्था संकटात आहे. वाढती महागाई आणि कोसळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे श्रीलंकेचे चलनाचे अवमूल्यन सुरू असल्याने श्रीलंकेत प्रचंड महागाई वाढली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे देशासमोर भूकबळीचे संकट उभे राहिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिथे एक कप चहा 100 रुपयांना मिळत आहे, तिथे दुधाचा दर प्रतिलिटर 2000 रुपयांवर गेला आहे. मिरचीला 700 रुपये, बटाट्याला 200 रुपये भाव मिळत आहे तर ब्रेडच्या पाकिटाची किंमत 150 रुपये झाली आहे. त्याचबरोबर दूध पावडर 1,975 रुपये प्रतिकिलो झाली आहे.
(हेही वाचा – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे जाहीर करणार अयोध्येच्या दौऱ्याची तारीख!)
या शहरांमध्ये संचारबंदी लागू
यावेळी संतप्त आंदोलकांनी हिंसक रूप धारण करून दगडफेक केली. संतप्त लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलीस आणि टास्क फोर्सला लाठीचार्ज करावा लागला. मात्र लोकांचा राग इतका अनावर झाला की त्यांनी पोलिसांची बस आणि जीप पेटवून दिली. यादरम्यान अनेक पत्रकारांसह 10 जण जखमी झाले. श्रीलंकेतील परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून कोलंबोसह अनेक भागात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या शहरांमध्ये कोलंबो उत्तर, कोलंबो दक्षिण, कोलंबो मध्य आणि नुगेगोडा विभागांचा समावेश आहे.
पेट्रोल 254 तर डिझेल 176 रुपये लिटर
रुग्णालयांमध्ये औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांचे ऑपरेशन थांबले आहे. पेट्रोल पंपावर दोन किमीपर्यंतच्या रांगा लागल्या असून खाद्यपदार्थ लोकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. वाढत्या महागाईमुळे लाखो लोक उपाशीपोटी जगत आहेत. समोर आलेल्या वृत्तानुसार, दोन आठवड्यांपूर्वी येथील पेट्रोलचे दर 50 रुपयांपर्यंत, तर डिझेलचे दर 75 रुपयांपर्यंत वाढविण्यात आले होते. आता तेथे पेट्रोल 254 रुपये लिटर तर डिझेल 176 रुपये लिटर झाले आहे. पेट्रोल-डिझेल खरेदी करण्याच्या प्रयत्नात अनेक लोकांना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे पेट्रोल पंपांवर लष्कर तैनात करण्यात आले आहे. तर कच्च्या तेलाच्या अनुपलब्धतेमुळे सरकारला आपली एकमात्र रिफायनरीही बंद करावी लागली आहे. 12.5 किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात 1.359 रुपयांची वाढ झाली आहे. आता सिलिंडरची किंमत 4,119 रुपये झाली आहे.
Join Our WhatsApp Community