कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आलं. ते अनेक निर्बंधांसह अजूनही सुरुच आहे, त्यामुळे या दोन वर्षांच्या कालावधीत लाॅकडाऊनचा खूप मोठा परिणाम पहायला मिळाला. अनेकांच्या नोक-या गेल्या, उत्पन्नाचे मार्ग बंद झाले, तर दुसरीकडे मात्र श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले. आता याचाच पुरावा देणारा एक अहवाल समोर आला आहे. जगभरातील गरिबी निर्मूलन संस्था ऑक्सफॅमने आपला ताजा अहवाल प्रकाशित केला आहे, या अहवालानुसार कोरोना काळात भारतातील अब्जाधीशांची संख्या वाढली तर, त्याचवेळी गरीबांच्याही संख्येत वाढ झाल्याचे जळजळीत वास्तव समोर आले आहे. कोरोना काळात भारतातील 84 टक्के कुटुंबांच्या वार्षिक उत्पन्नात लक्षणीय घट झाली आहे आणि दुसरीकडे मात्र अब्जाधीशांची संख्या 102 वरुन 142 वर गेल्याचे या अहवालात म्हटले आहे.
गरीब श्रीमंतामधील दरी वाढली
मार्च 2020 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत अब्जाधीशांची संपत्ती 23.14 लाख कोटी रुपयांवरुन दुप्पट होऊन 53.16 लाख कोटी रुपये इतकी झाली, तर याच वेळी मात्र 406 कोटींहून अधिक भारतीय कुटुंब कोरोना काळात गरिबीत लोटले गेले. यावरुन या अहवालातून स्पष्ट होते की, भारतात उत्पन्न विषमता आणि गरीब श्रीमंतामधील दरी वाढली आहे. देशातील सर्वांत श्रीमंत 100 व्यक्तींची एकत्रित संपत्ती 57 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तर 98 श्रीमंत भारतीयांकडे 49.27 लाख कोटी रुपयांची संपत्ती एकवटली आहे, जी 55.2 कोटी गरीब भारतीयांच्या एकत्रित संपत्तीएवढी म्हणता येईल.
( हेही वाचा :पटोले अडचणीत! मोदींना मारण्याची भाषा भोवली )
ऑक्सफॅम’चे निरिक्षण
या 98 टक्के अब्जाधीशांच्या संपत्तीवर 4 टक्के कर आकारला तर, त्यातून वसूल होणाऱ्या रकमेतून देशातील मध्यान्ह भोजन योजना 17 वर्षांपर्यंत किंवा सर्व शिक्षा अभियान 6 वर्षांपर्यंत सुरू ठेवता येईल. एवढेच नव्हे तर, या 98 टक्के श्रीमंतांच्या 1 टक्का संपत्तीवर कर आकारला, तर आयुष्यमान भारत योजनेचा 7 वर्षांहून अधिक काळासाठीचा खर्च भागवता येईल, असेही हा अहवाल म्हणतो. कोरोनाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर, आरोग्य विभागाच्या अंदाज पत्रकात 10 टक्क्यांची घट आढळून आल्याचे, 2020-21 च्या सुधारित अंदाजातून दिसते. तर, याच काळात अब्जाधीशांचा नफा विक्रमी पातळीवर वाढला आणि त्यांची संख्या 102 वरून 142 झाली, असेही निरीक्षण ‘ऑक्सफॅम’च्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community