ऑक्सिजनच्या गळतीने २२ रुग्ण दगावले… नाशिकच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार!

राज्यात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण असताना आता नाशिक रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आधीच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकमधील रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार समोर येत आहे. नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. अग्निशमन दलाकडून ही गळती थांबवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी या दुर्घटनेत २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.

(हेही वाचा : परम शांतीधाम वृद्धाश्रमात ५८ जण कोरोनाबाधित!)

३० ते ३५ रुग्ण गंभीर

नाशिक महापालिकेतर्फे झाकीर हुसेन रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सिलेंडरच्या टाक्या आहेत. बुधवारी दुपारी १२.३०च्या सुमारास या टाक्यांमधून ऑक्सिजनची गळती होण्यास सुरुवात झाली. ही गळती होत असलेला ऑक्सिजन थेट रस्त्यावर वाया जात असून, यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी ही माहिती दिली आहे. या रुग्णालयात १५० रुग्ण हे व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत ३० ते ३५ रुग्ण गंभीर अवस्थेत असल्याची माहिती मिळत आहे. एकूण ३०० जण ऑक्सिजनवर आहेत, तसेच याबाबत प्रशासनाकडून योग्य ती चौकशी केली जाईल व दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले.

काय म्हणाले राजेश टोपे?

नाशिकमध्ये झालेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. या टँकरमधील व्हॉल लीक झाल्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे स्थानिक प्रशासनाने कळवल आहे, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here