१२ ते २० नोव्हेंबर दरम्यान साजरा होणार पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव

पद्मभूषण महाराष्ट्रभूषण पु.ल.देशपांडे यांचा ८ नोव्हेंबर हा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नवोदित आणि होतकरु कलाकारांना आपली कला सादर करता यावी यासाठी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सव आयोजित करण्यात येतो. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमार्फत यावर्षी १२ ते २० नोव्हेंबर २०२२ असे एकूण 9 दिवस कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जीवन सुंदर आहे‘ ही या वर्षीच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला महोत्सवाची संकल्पना आहे.

पुलोत्सव म्हणून रसिकांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवाबद्दल बोलताना सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, हा महोत्सव आनंदयात्री पु.ल. देशपांडे यांना भावार्थ पुष्पांजली असणार आहे. या आनंदाच्या महोत्सवात विविध कार्यक्रम, स्टॉल्स तसेच उपक्रमांची रेलचेल असणार आहे. या महोत्सवांची सुरूवात तारपा आदिवासी नृत्याने होत असून त्यानंतर अकादमीची निर्मिती असणाऱ्या आणि अण्णा भाऊ साठे लिखित, शिवदास घोडके दिग्दर्शित ‘मुंबई कोणाची’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. पु.ल. देशपांडे आणि पंडित भीमसेन जोशी यांच्याविषयी पंडित भीमसेन जोशींचे शिष्य पंडित उपेंद्र भट हे आठवणी सांगून काही गाण्यांचे सादरीकरणदेखील करणार आहेत.

( हेही वाचा: अफजल खानाच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात; महसूल वनविभागाची कारवाई )

‘या’ कलाकारांना प्राधान्य

१४ नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी शालेय मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, बालचित्रपट महोत्सव असणार आहे. यावर्षी पहिल्यांदाच आदिवासी भागातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याकरता या महोत्सवात आमंत्रित करण्यात आले आहे. तसेच अंध, अपंग आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांनाही कला सादरीकरणाकरता निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांना काही दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. अन्य विविध कार्यक्रमांत अंध विद्यार्थ्यांचा संगीत सोहळा, महाराष्ट्रातील लोककलांचे सादरीकरण तसेच अन्य विविध कार्यक्रम असतील. मतिमंद, महिला बचत गट, तृतीयपंथीय आणि अपंगांकरिता विविध स्टॉल्सही येथे असणार आहेत. पु.लं. देशपांडे कला महोत्सवात नवोदितांना संधी देण्याचे धोरण असल्याने ज्यांनी मागील तीन वर्षात एकाही महोत्सवात मानधन घेतलेले नाही अशा कलाकारांना प्राधान्य देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here