पद्म पुरस्कार विजेत्यांनी दिली राष्ट्रीय युद्ध स्मारकास भेट!

143

नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी पुरस्कार सन्मान सोहळ्यातील पहिल्या भागात आयोजित समारंभात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वर्ष 2022 साठीच्या पद्म पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वर्षी दोन पद्म विभूषण, आठ पद्म भूषण आणि 54 पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने या वर्षी प्रथमच सर्व पद्म पुरस्कार विजेत्या मान्यवरांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक भेट आयोजित केली. या मान्यवरांनी स्मारकाची पाहणी केली. यावेळी, देशासाठी वर्षानुवर्षे सर्वोच्च त्याग करणाऱ्या तसेच देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या संरक्षण दलांतील कर्मचाऱ्यांची नावे वाचून ते सर्वजण हेलावून गेले.

(हेही वाचा – भारतीय लष्कराची तुकडी सेशेल्समध्ये दाखल)

या स्मारक भेटीचे आयोजन केल्याबद्दल तसेच देशाच्या राजधानीत सर्व लोकांनी तसेच मुलांनी भेट देण्याजोगी वास्तू म्हणून या स्मारकाला लोकप्रिय करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल पद्म पुरस्कार विजेत्यांनी सरकारचे आभार मानले. या स्मारकाला दिलेली भेट प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची, कर्तव्याप्रती समर्पणाची, धैर्याची आणि त्यागाची भावना रुजवेल आणि राष्ट्रवादाची भावना जागृत करेल अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान

यावर्षी ज्या पद्म पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले त्यांच्या नावांवर नजर टाकली तर पद्म पुरस्कार प्रदान प्रक्रियेत परिवर्तन घडविण्यासाठी केंद्र सरकारने जाणीवपूर्वक घेतलेल्या निर्णयाचा परिणाम दिसून येतो. निस्वार्थी भावनेने समाजाची सेवा करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यावर यात भर देण्यात आला आहे. तंत्रज्ञानाचा वापर आणि यावर्षी ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशन करण्याची पद्धत सुरु केल्यामुळे पुरस्कार विजेत्यांची निवड प्रक्रिया सोपी आणि सर्वसामान्यांना सहभागी होण्याजोगी झाली. त्यामुळे पद्म पुरस्कारांसाठी यावर्षी 4 लाख 80 हजारांहून अधिक प्रवेशिका सादर झाल्या. स्व-नाम निर्देशन, ऑनलाईन नाम निर्देशन, समाजासमोर येऊ न शकलेल्या महान व्यक्तींची मोठ्या प्रमाणावर निवड आणि पारदर्शक निवड प्रक्रिया यांच्यामुळे पद्म पुरस्कारांचे रुपांतर “जनतेचे पद्म” पुरस्कार म्हणून झाले.

या सोहोळ्याचा दुसरा भाग 28 मार्चला होणार

पुरस्कार वितरण सोहोळ्यानंतर, नवी दिल्ली येथे या सर्व विजेत्यांचे यश साजरे करण्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात, केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी पद्म पुरस्कार विजेत्यांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला. या सोहोळ्याचा दुसरा भाग 28 मार्च रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी 2019 रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारक देशाला अर्पण करण्यात आले. हे स्मारक स्वातंत्र्यप्राप्तीपासून आतापर्यंतच्या काळात शूर सैनिकांनी केलेल्या त्यागाची साक्ष देत आहे. या स्मारकाच्या ठिकाणी असलेली अमर ज्योत कर्तव्य करताना सैनिकांनी केलेल्या सर्वोच्च त्यागाचे उदाहरण देत आणि त्या त्यागाला अमरत्व देत उभी आहे. या स्मारकाच्या उद्घाटनापासून, राष्ट्रीय महत्त्व असलेल्या सर्व दिनांसह सगळ्या श्रद्धांजली समारंभांचे आयोजन याच ठिकाणी करण्यात येते. रोज संध्याकाळी, येथे नेक्स्ट ऑफ किन (एनओके) समारंभ आयोजित करण्यात येतो ज्यामध्ये देशासाठी प्राणार्पण केलेल्या सैनिकाचे निकटवर्तीय स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून त्या सैनिकाच्या सर्वोच्च त्यागाचे स्मरण करतात. देशातील तसेच परदेशातील सन्माननीय व्यक्ती त्यांच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून या स्मारकाला भेट देतात आणि भारताच्या शूरवीरांना आदरांजली वाहतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.