ठरलं तर… गुजरातच्या सिंहांचे महिन्याअखेरिस मुंबईत होणार आगमन

बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेरिस २९ नोव्हेंबर रोजी गुजरातहून सिंहाची नवी जोडी दाखल होणार आहे. अंदाजे अडीच ते साडेतीन वर्षांचे सिंह आणि एक सिंहीण आता मुंबईकर होणार असून, जानेवारीपासून उद्यानात बंद पडलेली सिंह सफारी पुन्हा सुरु केली जाण्याचा अंदाज वनाधिका-यांकडून व्यक्त केला जात आहे. अंदाजे २६ नोव्हेंबर रोजी वनाधिकारी सिंहाला गुजरातहून आणण्यासाठी गुजरातच्यादिशेने रवाना होतील.

( हेही वाचा : राज्यात २९ लाख १२ हजार मतदारांची नावे वगळली)

गेल्या सोमवारी वनविभागाच्या पश्चिम वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बॅन यांनी गुजरातमधील सक्करबागवाला प्राणिसंग्रहालयाला भेट दिली होती. या भेटीनंतर सिंहाची ओळख परेड झाल्याचे बोलले जात आहे. सिंहाच्या मोबदल्यात राष्ट्रीय उद्यानातील वाघाची जोडी गुजरातला दिली जाईल. सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकच सिंह उरला आहे. गेल्या महिन्यातच रवींद्र या १७ वर्षीय सिंहाचे वृद्धापकाळाने तसेच आर्थरायटीसच्या आजाराने निधन झाले होते. आता उद्यानातील एकमेव जेस्पा या ११ वर्षीय सिंहामध्येही आर्थरायटीसची सुरुवात झाली आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यात पशुवैद्यकीय अधिका-यांच्या टीमनेही जेस्पाची वैद्यकीय तपासणी केली होती.

सिंह येण्याअगोदर पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची घाई

उद्यानात पूर्णवेळ आणि निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पिंज-यातील प्राण्यांना दररोज उपचार मिळत नाहीत. वेळेवर उपचार न मिळाल्याने यंदाच्या वर्षात वाघाटी आणि दोन बिबट्यांच्या बछड्यांचा मृत्यू झाला. पशुसंवर्धन विभातील पशुवैद्यकीय अधिकारीच दहा किंवा आठवड्याभराच्या अंतराने येत असल्याने मरणासन्न अवस्थेत पोहोचलेल्या तीन बिबट्यांच्या बछड्यांना वनाधिका-यांनी तातडीने पुण्यातील रेस्क्यू या खासगी प्राणीप्रेमी संस्थेकडे उपचारांसाठी रवाना केले. परंतु त्यापैकी केवळ एकालाच वाचवता आले. या संपूर्ण प्रकरणाच्या वादानंतर उद्यानाने पशुसंवर्धन विभागातून होणा-या पशुवैद्यकीय अधिका-यांच्या प्रतिनियुक्तीला ब्रेक लावला आहे. कंत्राटी स्वरुपात येत्या आठवड्यातच पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची उद्यान प्रशासनाची योजना आहे. सोमवारी उद्यानात पशुवैद्यकीय अधिका-यांच्या नियुक्तीसाठी मुलाखतींची गडबड सुरु होती.

उद्यानात गुजरातहून सक्करबागवाला प्राणिसंग्रहालयातील सिंहाच्या जोडीचे २९ नोव्हेंबर रोजी आगमन होईल. उद्यानात पूर्णवेळ पशुवैद्यकीय अधिकारी मिळतील, यासाठी उद्यान प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.

– माहीप गुप्ता, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) वनविभाग

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here