चंद्रपूरात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांची गांभीर्यता लक्षात घेत, वाघांना जेरबंद करण्याच्या निर्णयानंतर वनविभागाने चंद्रपूरातील दोन वाघ नवीन वर्षांत पकडले. दोन्ही वाघ तातडीने मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पोहोचवले जाणार आहेत. यंदाच्या आठवड्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची टीम नागपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातून वाघ-वाघिणीची जोडी मुंबईत आणणार आहे. समृद्धी महामार्गावरुन विदर्भातून मुंबईत दाखल होणारी ही पहिलीच वाघांची जोडी असेल.
गेल्या वर्षांत चंद्रपूरात वाघांच्या हल्ल्यात ५३ माणसे मारली गेली. ब्रह्मपुरी, सावली, चितपल्ली या भागांत वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिकांनी वाघांना तातडीने जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयावर निषेध मोर्चाही काढला. वाघाच्या हल्ल्यातील मृतदेह उचलण्यासही लोकांनी पोलिसांना, वनविभागाला नकार दिला. वाढत्या संघर्षमय स्थितीमुळे वनविभागातील अधिका-यांचे निलंबन केले जाईल, असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला होता. वाघांना पिंज-यात ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने चंद्रपूर ट्रान्झिट सेंटरमधून या वाघ-वाघीणीची जोडी नागपूरातील गोरेवाडा बचाव केंद्रात काही दिवसांपूर्वीच दाखल झाली होती. या वाघांची रवानगी बोरिवलीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात करण्याचा निर्णय प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) माहिप गुप्ता यांनी घेतला. मंगळवारी वन्यप्राणी बचाव पथक नागपूरसाठी रवाना झाले. गोरेवाडा बचाव केंद्रात सध्या १९ वाघ आहेत. १५ पिंज-यांची क्षमता असलेल्या बचाव केंद्रात आता केवळ १७ वाघ उरतील. येत्या सहा महिन्यांत गोरेवाडा बचाव केंद्रातही पाच नवे पिंजरे उभारले जाणार असल्याची माहिती गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातून दिली गेली. याकरिता अंदाजे ३ कोटींचा खर्च येणार आहे.
Join Our WhatsApp Community