पंजाबमधील आव्हान: त्वरेने उपाय योजणे देशासाठी हितकारक- ब्रिगेडियर हेमंत महाजन

104

पंजाबमध्ये पाकिस्तान आणि आयएसआय दहशतवाद आणि अफू-गांजा-चरस तस्करी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे एक आपल्या देशासमोर असलेले आव्हान आहे, असे सांगत ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी गेल्या तीन दशकांपासून पंजाब शांत होता तो पंजाब आज हिंसक का झाला आहे, ते पाहाता त्यावर जितक्या लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील, तितके ते देशाच्या दृष्टीनेही हिताचे ठरेल, असे स्पष्ट प्रतिपादन केले.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या रस्त्यांवर धुडगूस

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी नवीन वर्षाचे सुरुवातीचे हे ऑनलाइन व्याख्यान सादर केले. या निमित्ताने उपस्थितांना आणि सर्व लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. येत्या काही दिवसांमध्ये देशासमोर या वर्षात काय आव्हाने असतील त्यावरही ते विविध विषयांवर ते संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंजाबमधील संभाव्य दहशतवादी कृत्ये हाणून पाडण्यासाठी परदेशात राहाणाऱ्यां या दहशतवाद्यांना तेथील सरकरामार्पथ पकडून भारतात आणले गेले पाहिजे, त्याचप्रमाणे त्यांच्या येथे घडवण्यात येणाऱ्या कृत्यांवरही आळा घालण्यासाठी गुप्तचर यंत्रणा अधिक बळकट करायला हवी, असेही त्यांनी सांगितले. तीन दशकांपासून शांत असणारा पंजाब हिंसक का झाला, त्या संबंधात त्यांनी विविध घटनांचा मागोवा घेत आणि त्यावरील माहिती दिली. शेतकरी आंदोलनाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, पंजाबमधील कृषी कायदाविरोधी आंदोलकांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या रस्त्यांवर धुडगूस घालत, राष्ट्रध्वजाचा अवमानही केला होता. आंदोलनस्थळी हिंसाचाराची सुरुवात निहंगांना मैदानात उतरवण्यातून झाली होती. ऑक्टोबरमध्ये निहंगांनी ‘गुरूग्रंथसाहेब’च्या अवमानावरुन एका व्यक्तीला ठार मारले.

हिंसाचार घडवणे सोपे पण…

३५० वर्षांपूर्वी गुरू गोविंद सिंह यांनी इस्लामी आक्रमकांशी लढण्यासाठी शस्त्रसज्ज ‘निहंग’ पथकाची स्थापना केली होती. नंतर मात्र, देशाच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीत आमुलाग्र बदल झाला. त्यामुळे हत्यारबंद ‘निहंग’ पथकाचीही गरज नाही. निहंगांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, पण गेल्या सात दशकांत तसे झाले नाही. म्हणून कृषी आंदोलनादरम्यान हातात तलवारी घेऊन पोलिसांच्या अंगावर धावून जाताना ‘निहंगां’ना सर्वांनी पाहिले होते, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, हिंसाचार घडवणे सोपे असते. पण, त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड काम असते. त्याचा अनुभव देशाने पंजाबमध्येच ८०च्या दशकात घेतला होता. म्हणूनच पंजाबमधील आताची ज्वालामुखीच्या उंबरठ्यावरील परिस्थिती पाहता, व्यापक उपायांची आवश्यकता वाटते.

जाचक कायदे वाकवून खलिस्तान्यांचा नायनाट

राजकीय इच्छाशक्ती व प्रामाणिक, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांची गरज असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. भारताला पंजाबच्या या चक्रव्यूहातून बाहेर पडणे शक्य आहे. प्रामाणिक राजकीय इच्छाशक्ती हा या समस्येवरचा उपाय आहे. के. पी. एस. गिल यांच्यासारख्या पोलीस अधिकाऱ्याने प्रसंगी जाचक कायदे वाकवून खलिस्तान्यांचा नायनाट केला, त्याचप्रमाणे एखाद्या प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अनुभवी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यास मुक्तहस्ते काम करू दिल्यास उपक्रम यशस्वी होऊ शकतो. त्या करता केंद्र आणि राज्य अशा दोघांनाही हातात हात घालून काम करणे गरजेचे आहे, असेही महाजन यांनी स्पष्ट सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.