पूरग्रस्त पाकिस्तानला भारताकडून मदत नाही; पाकिस्तान म्हणतो, “ते आता बदललेत”…

सध्या पाकिस्तानात पुराने थैमान घातले आहे. पाकिस्तानचा शेजारील देश म्हणून भारताने पाकिस्तानला कोणतीही मदत न केल्याने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी नाराजी जाहीर केली आहे. आम्ही भारताकडे मदत मागितलेली नाही, तसेच भारतानेही आम्हाला कोणतीही मदत केली नसल्याचे, बिलावल भुट्टो यांनी न्यूयाॅर्कमध्ये फ्रान्स 24 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

भारताशी सध्याच्या घडीला असणा-या संबंधांवर बिलावल भुट्टो यांनी भाष्य केले. ते म्हणाले, आमचा फार जुना आणि गुंतागुंतीचा इतिहास आहे. दुर्दैवाने आजचा भारत बदललेला आहे. स्थापनेच्या वेळी नागरिकांना आश्वस्त केलेला धर्मनिरपेक्ष भारत आता राहिलेला नाही. अल्पसंख्यांक असणा-या ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्याआधारे भारत आता हिंदूंचे वर्चस्व असणारा देश बनत आहे. फक्त भारतातच नाही तर दुर्दैवाने बेकायदेशीरपणे कब्जा केलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्येही हे दिसत आहे, असा आरोपही बिलावल भुट्टो यांनी केला.

( हेही वाचा: आदित्य सेनेच्या ‘टक्केवारी’मुळेच मराठी माणूस मुंबईतून हद्दपार; नितेश राणेंचा हल्लाबोल )

दोन्ही देशांच्या तरुणाईला शांतता हवी

पुढे बोलताना त्यांनी भारतात अल्पसंख्यांक असणारे मुस्लिम असुरक्षित असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की भारत अशाचप्रकारे आपल्या मुस्लिम नागरिकांना वागणूक देत आहे. मग ते पाकिस्तान आणि काश्मीरमधील मुस्लिमांना कशी वागणूक देत असतील याचा विचार करा, मात्र सध्याच्या घडीला दोन्ही देशांच्या तरुणाईला शांतता हवी असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here