भारताने फाडला पाकच्या चांगुलपणाचा बुरखा! संयुक्त राष्ट्र महासभेत साधला निशाणा

कायमंच दहशतवाद्यांना आश्रय, मदत आणि सक्रियपणे समर्थन देण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांच्या महासभेला सुरुवात झाली आहे. यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी नेहमीप्रमाणे काश्मीरच्या मुद्द्यावरुन आपले रडगाणे गायला सुरुवात केली. यावेळी भारताने पाकिस्तानची दहशतवादाप्रती असलेली भूमिका संपूर्ण जगासमोर मांडली. यावरुन भारताने पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधत पाकच्या चांगुलपणाचा बुरखा महासभेत फाडला.

दहशतवाद्यांना आश्रय देणारा देश 

भारताविरुद्ध पाकिस्तान करत असलेल्या अपप्रचाराची माहिती यावेळी भारताकडून संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना देण्यात आली. कायमंच दहशतवाद्यांना आश्रय, मदत आणि सक्रियपणे समर्थन देण्याचा पाकिस्तानचा इतिहास आहे. दहशतवाद्यांना उघडपणे समर्थन देणे, प्रशिक्षण देणे, शस्त्रास्त्रे पुरवणे आणि वित्तपुरवठा करणे हे पाकिस्तानचे कायमंच धोरण राहिले आहे, असे स्पष्ट मत भारताकडून व्यक्त करण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद(UNSC)कडून बंदी घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा पाकिस्तानचा रेकॉर्ड आहे. ओसामा बिल लादेनला पाकने आश्रय दिला. इतकंच नाही तर त्याला पाकिस्तानकडून त्याला हुतात्मा म्हटले जाते, असा थेट आरोप भारताकडून करण्यात आला.

भारताची बदनामी करण्याचा पाकचा प्रयत्न

काश्मीरच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत वक्तव्य केले. भारताने एकतर्फी पावले उचलत काश्मीरवर जबरदस्तीने कब्जा केल्याचा आरोप यावेळी इमरान खान यांनी केला. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारतातील अंतर्गत व्यवहार जागतिक मंचावर आणण्याचा आणि खोटी माहिती पसरवून देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला उत्तर देण्यासाठी आपण आपल्या अधिकाराचा वापर करत असल्याचे भारताच्या प्रथम सचिव स्नेहा दुबे यांनी महासभेत सांगितले.

बळकावलेले क्षेत्र त्वरित सोडा

जम्मू -काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचे अविभाज्य भाग होते आणि आहेत. यातील काही भागांवर पाकिस्तानने बेकायदेशीररित्या कब्जा केला आहे. आम्ही पाकिस्तानला त्यांच्या बेकायदेशीररित्या बळकावलेले क्षेत्र त्वरित रिक्त करण्याचे आवाहन करतो, असेही भारताकडून महासभेत सांगण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here