पाकिस्तान तालिबान्यांचा संरक्षक… काश्मीर काबिज करण्याची पाकला पुन्हा खुमखुमी

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपले स्थान बळकट केल्याने त्यांच्या मदतीने पाकिस्तान काश्मीर जिंकण्याचे दिवा स्वप्न पाहत आहे.

84

अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य प्रस्थापित झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात अराजकता माजली आहे. पण यामुळे मात्र आपली ताकद वाढल्याचा फाजील आत्मविश्वास पाकिस्तानला आला आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा काश्मीर काबीज करायची पाकिस्तानला खुमखुमी आली आहे. त्यांचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काही दिवसांपूर्वी काश्मीर काबिज करण्यासाठी आपल्याला तालिबान मदत करेल, असे विधान केले होते. त्यानंतर पाकिस्तान सरकारमधील सर्व पोपट आपल्या बोलवित्या धन्याचेच बोल बोलायला लागले आहेत. पाकिस्तान हा तालिबान्यांचा संरक्षक असल्याचे विधान पाक सरकारचे मंत्री शेख राशीदने केले आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही मुक्ताफळे उधळली.

आम्ही तालिबानी नेत्यांचे संरक्षण केले

तालिबानने पाकिस्तानला त्यांचे ‘दुसरे घर’ म्हटल्यानंतर, पाकिस्तानचे मंत्री शेख रशीद यांनी आता एका टीव्ही शोमध्ये कबूल केले आहे की, इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार खरोखरच तालिबानी नेत्यांचे संरक्षक आहे.
आम्ही तालिबानी नेत्यांचे संरक्षक आहोत. आम्ही त्यांची दीर्घकाळ काळजी घेतली आहे. त्यांना पाकिस्तानात निवारा, शिक्षण आणि घर मिळाले. आम्ही त्यांच्यासाठी सर्व काही केले आहे, असे रशीदने उघडपणे जाहीर केले. अमेरिकेचा निषेध आणि तालिबानचे स्वागत करताना रशीदने गेल्या आठवड्यात आणखी एका मुलाखतीत हे देखील उघड केले होते की, पाकिस्तान अमेरिकेच्या सैन्याला दीर्घकाळ ठेवण्यास इच्छुक नाही.

तालिबानकडून होत आहे मदत

इम्रान खान सरकार जिहादी संघटनेशी काहीही संबंध नसल्याचा आव आणत आहे. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये आपले स्थान बळकट केल्याने त्यांच्या मदतीने पाकिस्तान काश्मीर जिंकण्याचे दिवा स्वप्न पाहत आहे. एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर बोलताना इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या नीलम इर्शाद शेख यांनी म्हटले होते की ‘तालिबान आमच्यासोबत आहे’ आणि ते आम्हाला काश्मीर जिंकण्यास मदत करतील.

पाकिस्तान तालिबानचा बचाव करतो

अफगाणिस्तानला पाठिंबा देण्यासाठी आपण विधायक भूमिका निभावत राहील, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी स्पष्ट केले होते. कुरेशी यांनी अफगाणिस्तानला आपला नवा आवडता शेजारी असल्याचं सांगत, जागतिक संघटनांनी अफगणिस्तानला आर्थिक मदत करावी, अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही ताज्या मुलाखतीत तालिबानला ‘सामान्य नागरिक’ म्हटले आहे. तालिबान सत्तेत आल्यावर अफगाणच्या नागरिकांनी ‘गुलामगिरीच्या साखळी’ तोडल्याचा दावा त्यांनी केला होता.

पाकिस्तानसोबत नाते दृढ करायचे आहे

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी एका मुलाखतीदरम्यान आपले पाकिस्तानशी असलेले दृढ नाते व्यक्त केले. अफगाणिस्तानला जोडून पाकिस्तानची सिमा आहे. धर्माच्या बाबतीत आम्ही एकच आहोत, दोन्ही देशांचे लोक एकमेकांमध्ये मिसळतात. त्यामुळे आम्ही पाकिस्तानसोबतचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहोत, असे मुजाहिद म्हणाला होता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.