मुसळधार पाऊस असतानाही मासेमारीसाठी समुद्रात गेले अन्…

137

पालघरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे समुद्राला उधाण आले आहे. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस असूनही समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या दोन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी दोघांचे मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर आढळून आले. गोपाळ मडवे आणि वसंत राऊत अशी मृतांची नावे आहेत. दोन्ही मच्छीमार डहाणूच्या बहड येथील रहिवासी होते, अशी माहिती मिळतेय.

(हेही वाचा – “…हीच आपली इच्छा, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं”; राज ठाकरेंचं मनसैनिकांना पत्र)

घरी न परतल्याने शोध सुरू

डहाणू तालुक्यातील बहड गावातील दोन मच्छिमार सोमवारी जिल्हा प्रशासनाने नाकारल्यानंतरही मासे पकडण्यासाठी समुद्रात गेले होते. सोमवारी सायंकाळपर्यंत दोघेही घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू झाला. आज, मंगळवारी सकाळी या दोन्ही मच्छिमारांचे मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर आढळून आले. पालघर पोलिसांच्या पथकाने दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, मंगळवारीही पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये आणि अत्यावश्यक काम असेल तेव्हाच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा

पालघर जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ या प्रमुख नद्यांना पूर आला असून पुराचे पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.