पालघर येथील वाघोबा खिंडीच्या परिसरात एसटीच्या रातराणी बसचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. भुसावळवरून पहाटे पालघरकडे येणारी रातराणी बस चालकाचे नियंत्रण सुटून वाघोबा खिंडीत कोसळली असल्याची माहिती मिळतेय. भुसावळ ते बोईसर ही एसटी बस पालघर वाघोबा खिंड येथील २० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असून, काहींना पालघर ग्रामीण रुग्णालयात तर काहींना अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
…आणि बस थेट २० फूट दरीत कोसळली
भुसावळवरून बोईसर डेपोकडे येणारी ही बस पहाटे ६ वाजल्याच्या सुमारास पालघर-मासवण रस्त्यावरून पालघरकडे येत असताना बस चालकचे नियंत्रण सुटल्याने वाघोबा खिंडीतील उतारावरून ही बस दरीत कोसळली. प्राथमिक माहिती अशी सांगितली जात आहे की, एसटी बसचा चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्यामुळे चालकाचे एसटीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट २० फूट दरीत कोसळली.
(हेही वाचा – SBI मध्ये मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर होण्याची संधी! परीक्षेविना मुलाखत, किती असणार पगार?)
बस चालक मद्यपान अवस्थेत
ही घटना घडल्यानंतर पोलीस, महसूल, आरोग्य विभागासह एसटी विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तर बस चालक मद्यपान करून बस चालवत होता, अशी माहिती प्रवाशांनी दिली. प्रवाशांनी यावर आक्षेपही घेतला होता. त्यांनी एसटीच्या कंडक्टरकडेही त्यांची तक्रारही केली होती. चालक वेगात एसटी चालवत होता. मात्र, कंडक्टरने त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा परिणाम दुर्दैवी घटना घडून झाला, असेही काही प्रवाशांनी म्हटले आहे.