विठोबाच्या दर्शनासाठी पायी चालणा-या वारक-यांच्या पालखी सोहळयात अडचणी येऊ नये म्हणून हवामान विभागाने मंगळवारपासून विशेष हवामान योजना घाईघाईने कार्यान्वित केली. पुणे वेधशाळेच्या संकेतस्थळावर मंगळवारपासून सेवा सुरु झाली असली तरीही हवामान अंदाजाबाबत पूरेशी माहिती बुधवारपासून दिली जाईल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे वातावरण संशोधन विभागाचे प्रमुख डॉ अनुराग कश्यपी यांनी दिली.
या विशेष लिंकवर हवामान कळणार
वेधशाळेच्या संकेतस्थळावर ‘पंढरपूर वारी २०२२- विशेष हवामान सेवा’ या नव्या लिंकवर पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज तसेच प्रत्येक तीन तासांच्या घडामोडींचा अंदाज जाहीर करण्याचा वेधशाळेच्या अधिका-यांचा विचार आहे. प्रत्यक्षात ही सेवा बुधवारपासून सुरु होणार आहे. ‘पंढरपूर वारी २०२२- विशेष हवामान सेवा’ या लिंकवर पिंपरी-चिंचवड ते पंढरपूर मार्गातील ठिकाणांवर संबंधित तारखेला अपेक्षित हवामानाची माहिती उपलब्ध आहे. ‘पंढरपूर वारी २०२२- विशेष हवामान सेवा’ या लिंकवर क्लिक केल्यानंतर सध्याचे ठिकाण व हवामान अंदाज या लिंकवर हवामानाची माहिती अपलोड करण्यात आली आहे.
(हेही वाचा – ‘जय महाराष्ट्र’ म्हणत ३५ नव्हे ४० सेना आमदार सोबत असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा!)
विशेष हवामान सेवा कार्यान्वित
मंगळवारी विशेष हवामान सेवा कार्यान्वित केल्यानंतर दुपारी एकनंतर माहिती अद्यायावत केली नव्हती. शहरावर क्लिक केल्यास मंगळवारची तारीख, वेळ यासह संबंधित ठिकाणातील अंदाज, चेतावनी आणि सल्ला या स्वरुपात माहिती पुरवली आहे. मात्र अंदाज आणि सल्ला या वर्गवारीतील माहिती गोंधळात भर टाकणारी होती. या माहितीच्या तपशीलावर बुधवारी काम केले जाईल, असे आश्वासन डॉ अनुराग कश्यपी यांनी दिली.