सचिन वाझेची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यासाठी सह पोलिस आयुक्त (गुन्हे) यांचा तीव्र विरोध होता. मात्र केवळ तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आग्रहामुळे सचिन वाझे याला गुन्हे शाखेत घेण्यात आले होते. असा गौप्यस्फोट मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह विभागाला पाठवण्यात आलेल्या अहवालात केला आहे. या अहवालात तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे.
काय आहे अहवालात?
सीआययु प्रभारीपद हे पोलिस निरीक्षक दर्जाचे पद असून देखील केवळ तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आग्रहामुळे पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची सीआययु मधून बदली करण्यात आलेली होती. सीआययुच्या प्रभारीपदी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याची नियुक्ती करण्यात आली होती, असे ही अहवालात म्हटले आहे. सचिन वाझे हे केवळ प्रत्येक गुन्ह्याची रिपोर्टिंग तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना करत होते. वाझेने एसीपी, डीसीपी यांना कधीच गृहीत धरले नव्हते, असे देखील अहवालात म्हटले आहे. वाझे यांच्या सीआययु युनिटला तीन सरकारी वाहने देण्यात आली होती, तरीही वाझे हे कार्यालयात येताना खाजगी हाय एन्ड लक्जरी गाड्या (मर्सिडीज बेंज,ऑडी) यांसारखी वाहने वापरत होते, असे सुद्धा अहवालात सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः महाराष्ट्रातील असेही काही घोटाळे ज्यांची आजही होते चर्चा!)
अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
- बडतर्फ सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या बैठकीत सहपोलिस आयुक्त प्रशासन, अप्पर पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त (मंत्रालय व सुरक्षा) हे उपस्थित होते.
- पोलिस आस्थापनाच्या बैठकीत सचिन वाझे यांची गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली. दुसऱ्याच दिवशी तत्कालीन सह पोलिस आयुक्त (गुन्हे) यांच्या स्वाक्षरीने सीआययु मध्ये बदली करण्यात आली होती.
- कोविड प्रादुर्भाव निमित्ताने मुंबई पोलिस दलातील निलंबित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेत सामील करुन घेण्यासाठी तीन बैठका घेण्यात आल्या होत्या. एकूण ५७ अधिकारी/ कर्मचारी यांना पुन्हा सेवेत सामील करुन घेण्यात आले होते.
- सचिन वाझे ज्या सीआययुचे प्रभारी होते त्या सीआययुकडे १७ गुन्ह्यांचा तपास होता. सचिन वाझे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्ह्याच्या तपासाची रिपोर्टिंग करत नव्हते. ते थेट तत्कालीन आयुक्तांनाच रिपोर्टिंग करायचे आणि त्याच्या सांगण्यानुसार पुढील कारवाई होत असे. ही सूचना वाझे यांनी सीआययुमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचारी यांना देखील इतर कुठल्याही अधिकऱ्यांना रिपोर्टिंग पासून वंचित ठेवता केली होती.
- टीआरपी, दिलीप छब्रिया, तसेच इतर महत्वाच्या गुन्हयांतील ब्रिफिंग मंत्री यांना करण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त यांच्यासोबत सचिन वाझे कायम असायचे.
Join Our WhatsApp Community