‘या’ प्रकरणी परमबीर सिंह फरार घोषित; वाचा सविस्तर

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंह उर्फ बबलू यांना न्यायालयाकडून फरार घोषित करण्यात आले आहे. गोरेगाव येथील खंडणीच्या गुन्ह्यात फरार घोषित केल्यानंतर या तिघांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गोरेगाव येथील हॉटेल बोहो अँड रेस्टॉरंट हे विनादिक्कत सुरू ठेवून पोलिसांच्या कारवाई पासून वाचवण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस अधिकारी सचिन वाझे याने तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार हॉटेल मालक बिमल अग्रवाल याने गोरेगाव पोलीस ठाण्याचे केली होती. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग, सचिन वाझे, खाजगी इसम अल्पेश पटेल, रियाज भाटी, विनय सिंह उर्फ बबलू, सुमित सिंह उर्फ चिंटू यांच्याविरुद्ध खंडणी, धमकी देणे, कट रचणे, पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

(हेही वाचा – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ‘फरार’ घोषित)

मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ करणार या गुन्ह्याचा तपास 

या गुन्ह्याचा तपास मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ कडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी गुन्हे शाखेने अल्पेश पटेल आणि सुमित सिंह या दोघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान गुन्हे शाखेने परमबीर सिंग, रियाज भाटी, विनय सिंह उर्फ बबलू यांना नोटीस पाठवून देखील त्यांनी नोटिसीला उत्तर दिलेले नाही अथवा चौकशीसाठी सामोरे आलेले नव्हते. दरम्यान मुंबई गुन्हे शाखेने पंधरा दिवसापूर्वी सचिन वाझे याला या प्रकरणात तळोजा तुरुंगातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली होती. गुन्हे शाखेने परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंह यांच्या पत्नी व कर्मचारी यांचे जबाब नोंवून घेतले होते.

गुन्हे शाखने कसली कंबर 

परमबीर सिंग रियाज भाटी आणि विनय सिंह हे मिळून येत नसल्यामुळे या तिघांना न्यायालयाने फरार घोषित करावे यासाठी गुन्हे शाखेने किल्ला न्यायालयात शनिवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर बुधवारी किल्ला न्यायालयात सुनावणी झाली असून परमबीर सिंग, रियाज भाटी आणि विनय सिंह या तिघांना न्यायालयाने फरार घोषित केले आहे. या तिघांना फरार घोषित केल्यानंतर तिघांच्या नावावर असलेल्या संपत्तीवर देखील टाच येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रियाज भाटी हा या प्रकरणानंतर गायब झाल्यानंतर रियाज भाटी याचा शोध घेण्यात येत होती, मात्र त्याचा काही थांगपत्ता लागत नसल्यामुळे रियाज भाटिचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखने कंबर कसली असून मुंबई गुन्हे शाखेच्या इतर कक्ष आणि खंडणी विरोधी पथकांना भाटीचा शोध घेऊन त्याला अटक करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here