फरार परमबीर सिंह चंदीगडमध्ये, चौकशीला राहणार हजर!

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह फरार म्हणून घोषित आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, परमबीर सिंह सध्या चंदीगडमध्ये आहे. न्यायालयाने आदेश दिल्यास चौकशीला हजर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. परंतु, लवकर परमबीर सिंह मुंबईतील त्यांच्याशी संबंधित प्रकरणांच्या तपासात सहभागी होणार आहेत.

17 नोव्हेंबरला परमबीर सिंह फरार घोषित

17 नोव्हेंबरला परमबीर सिंह यांना फरार म्हणून घोषित करण्यात आले होते. फरार घोषित केल्यानंतर त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली होती. परंतु, 30 दिवसांत परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार होता. मुंबई आणि ठाण्यात खंडणीसह जातीवाचक शिवीगाळ तसेच इतर अनेक आरोपांखाली परमबीर सिंग यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी परमबीर सिंह यांना खंडणी आरोप या प्रकरणी अटकेपासून संरक्षण दिले आहे. तर यासह न्यायलयाने त्यांना तपासात सहभागी होण्याचेही आदेश दिले.

(हेही वाचा – अखेर ‘लालपरी’चे विलिनीकरण लटकले, मात्र कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ)

लवकरच मुंबईत येणार…?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे बुधवारी अचानक टेलिग्राम आणि व्हाट्सएप वर ऑनलाईन दिसले. परमबीर सिंग यांच्याशी संपर्क व्हावा म्हणून अनेक पत्रकारानी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कुणालाही प्रतिसाद दिला नाही. काही वेळाने त्यांनी टेलिग्राम वरील आपले खाते डिलीट केले. परंतु दिल्लीतील एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराला परमबीर सिंग यांनी प्रतिसाद देत त्यांचा फोन घेतला. ‘मी कुठेही गेलेलो नाही, मी चंदीगड मध्येच असून लवकरच मुंबईत येणार आहे’, असे त्यांनी म्हटले आहे. परमबीर सिंग परदेशात नसून भारतातच असल्याची खात्री झाली असली तरी ते मुंबईत केव्हा येतील आणि आल्यानंतर ते न्यायालयाला शरण जातात का ? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here