परमबीर सिंग यांच्या बेकायदेशीर संपत्तीची होणार चौकशी

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले असले, तरी राज्यातील गृहविभागाकडून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परमबीर सिंग यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सिंग यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे. ही चौकशी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान परमबीर सिंग हे रजेवरून परत आल्याचे गृहविभागाला कळवले नसल्यामुळे गृहविभागाकडून विभागीय कारवाई देखील होण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय कारण पुढे करून रजेवर गेलेले

मुंबई पोलिस आयुक्त पदावरून पायउतार करण्यात आल्यानंतर परमबीर सिंग यांच्याकडे राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान मे महिन्यात परमबीर सिंग हे वैद्यकीय कारण पुढे करून रजेवर गेले होते. परमबीर सिंग हे रजेवर गेल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या, परमबीर सिंग यांच्यावर मुंबई ठाण्यात खंडणीची गुन्हे दखल झाले होते तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागात सिंग यांच्या विरोधात भष्टाचाराचे दोन प्रकरणाची खुली चौकशी सुरु आहे.

(हेही वाचा संपात फूट! ९ हजार एसटी कामगार रुजू)

२३१ दिवसांनंतर मुंबईत दाखल

परमबीर सिंग यांच्यावर ते ठाणे पोलिस आयुक्त असताना तसेच मुंबई पोलिस आयुक्त असताना मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर संपत्ती कमावली असल्याचा आरोप करण्यात आला होता. सूत्रांची दिलेल्या माहितीनुसार परमबीर सिंग यांच्या बेकायदेशीर संपत्तीची चौकशी करण्यात येणार असून ही चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान वैद्यकीय रजेवर गेलेले परमबीर सिंग हे २३१ दिवसानंतर गुरुवारी मुंबईत दाखल झाले आहे, मात्र त्यांनी याबाबत गृहविभागाला अद्याप कुठलीही सूचना दिलेली नसल्यामुळे गृहविभागाकडून विभागीय कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here