…तर पावसाळ्यात परशुराम घाट बंद राहणार!

117

पावसाळा सुरू होत असून पावसाचे प्रमाण अधिक वाढल्यास मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणजवळील परशुराम घाट तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवला जाईल. पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. त्यामध्ये याबाबतचा निर्णय झाला. परिवहन मंत्री अनिल परब या बैठकीला दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

… तर परशुराम घाट बंद राहणार

बैठकीत ठरल्यानुसार अधिक पावसाचा अंदाज वर्तविला गेला असेल तर परशुराम घाटात तात्पुरती वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. पूर्ण पावसाळ्यात तेथे २ जेसीबी आणि ६ टिप्पर सज्ज असतील. शिवाय २ पथके चोवीस तास लक्ष ठेवतील. घाटाचे काम नव्याने झालेले आहे. त्यामुळे पावसात माती रस्त्यावर येण्याची शक्यता गृहीत धरून वेळीच रस्ता साफ करून वाहतूक सुरळीत ठेवण्याकरिता ही व्यवस्था राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि कंत्राटदारांनी केली आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देताना पालकमंत्री म्हणाले, संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात आपण कोठेही कमी पडणार याची खबरदारी घ्यावी. गेल्या वर्षातील आपत्कालीन परिस्थितीचा विचार करता यावर्षीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे गृहीत धरूनच संभाव्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यात आपली यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत तेथील जनतेला तात्काळ मदत मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणा सक्षमपणे तयार ठेवावी. दामिनीसारख्या ॲपचा येथील जनतेकडून जास्तीत जास्त वापर होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले.

( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या मिनी बसेसकडे प्रवाशांची पाठ… कारण काय वाचा! )

खासदार विनायक राऊत म्हणाले, दरडप्रवण गावांवर जास्त लक्ष ठेवावे. दरड कोसळणे टाळण्यासाठी संरक्षक भिंतसारखी उपाययोजना करावी. शास्त्री नदीवरील पूल जुना असून नवीन पुलाच्या एका बाजूचा ॲप्रोच रस्ता झाला असून दुसऱ्या बाजूचा ॲप्रोच रस्ता तात्काळ तयार करून तो पावसाळा सुरू होण्यापूर्वी सुरू करण्यासाठी प्रयत्न करावा.

दरडप्रवण क्षेत्रातील प्रत्येक गावात प्राथमिक अंदाजासंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणाही सक्षमपणे तयार आहे. सामाजिक संस्थांनाही आपत्कालीन परिस्थितीसंदर्भात प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले. यावर्षी आपत्कालीन परिस्थिती उद्भवणार नाही आणि निर्माण झालीच तर ती सक्षमपणे हाताळू, असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.