मुंबई महापालिका मुख्यालयाची डागडुजीचे काम सध्या जोरात सुरू असून जी-२०चे शिष्टमंडळ महापालिकेत भेट देणार असल्याने जुन्या इमारतीचा मेकओवर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे, विशेष म्हणजे या रंगरंगोटीमध्ये महापालिकेतील पक्ष कार्यालयांचा परिसर असलेला तळमजला आकर्षक बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु बाहेरील परिसर चकाचक केला जात असला तरी प्रत्यक्षात या कार्यालयांच्या आतील भागात मात्र वाळवी लागलेली आहे. त्यामुळे बाहेरुन रंगरंगोटी केली जात असताना येथील पक्षांचे फलक काढून त्या पक्ष कार्यालयांची ओळखच पुसून टाकण्याचा प्रयत्न महापालिकेने केला.
मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील तळ मजल्यावर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांची पक्ष कार्यालये आहेत. मुंबई महापालिकेचा कालावधी ७ मार्चला संपुष्टात आल्यानंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून ही कार्यालये सुरू ठेवण्यात आली होती. परंतु दोन शिवसेनेत वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेसह इतर पक्ष कार्यालयेही बंद करण्यात आली. त्यानंतर याठिकाणी व्हरांड्यात ठेवलेले बाकडेही काढून टाकण्यात आले आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून ही कार्यालये बंद असून या बंद कार्यालयांमधील लाकडांना तसेच फर्निचर आणि कागदांना वाळवी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही कार्यालये दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद राहिल्यास त्यामध्ये वाळवी लागण्याची दाट शक्यता असून सर्व पक्ष कार्यालये सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ बंद असल्याने वाळवीने ही कार्यालये पोखरुन काढली असेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
(हेही वाचा – रस्ते कंत्राट: आदित्य ठाकरे म्हणतात, चहल यांचा कारभार अपारदर्शक)
मात्र, एका बाजूला ही कार्यालये बंद असल्याने त्यांना वाळवी लागलेली असताना दुसरीकडे कार्यालयांचा दर्शनी भाग असलेल्या व्हरांड्यांची डागडुजी करत रंगरंगोटी केली जात आहे. या सर्व व्हरांड्यातील पक्षांचे फलक काढून टाकण्यात आले असून कोणत्याही प्रकारची पक्षांची कार्यालये असल्याचा लवलेशही या नुतनीकरणात ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे याठिकाणी पक्ष कार्यालये होती अशीही ओळख ठेवण्यात आलेली नसून ज्या कार्यालयांचे प्रवेशद्वार सुशोभित करण्यात आले, त्याच्या आतील भाग वाळवी लागून बकाल बनल्याने जी २०च्या अधिकाऱ्यांना ही कार्यालये उघडून दाखवण्याची हिंमत महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बाल सिंह चहल करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community