कॉर्डिलिया क्रूझवर कोरोनाचे ‘एंटरटेनमेंट’

150

कॉर्डिलिया क्रूझ मुंबई-गोवा-मुंबई या मार्गावर चालते. गोव्यात कार्निव्हल असल्यामुळे ही क्रूझ गोव्याला रवाना झाली होती. यातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे एकूण सर्व २ हजार ०६५ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली, यात ६६ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व नागरिकांना तात्काळ जहाजावरच विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. ही क्रूझ मंगळवारी ४ जानेवारी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील ग्रीन गेट येथे दाखल झालेली आहे. मुंबईत आल्यावर कॉर्डिलिया क्रूझवरील एकूण १ हजार ८२७ प्रवाशांची कोविड तपासणी करण्यात आली होती. दोन वैद्यकीय प्रयोगशाळांनी मिळून या सर्वांची चाचणी केलेली आहे.

प्रवाशांची चाचणी

यापैकी एका वैद्यकीय प्रयोगशाळेने ९९५ प्रवाशांची चाचणी केली होती. त्यामध्ये ९९५ पैकी १२३ जण कोविड बाधित असल्याचे अहवाल प्राप्त झाला आहे. तर उर्वरित ८३२ जणांची चाचणी दुसऱ्या वैद्यकीय प्रयोगशाळेने केली असून त्यांचे अहवाल काही वेळाने प्राप्त होण्याची शक्यता आहे. कॉर्डिलिया क्रूझ मुंबईत आल्यानंतर त्यावरील बाधित रुग्णांना भायखळा येथील रिचर्डसन आणि क्रुडास जम्बो कोविड केंद्र आणि इतर विविध हॉटेल्समध्ये यापूर्वीच दाखल केले आहे.

( हेही वाचा : कोविड रुग्ण वाढीची लांब उडी : दिवसभरात १५ हजार रुग्ण )

प्रशासन सतर्क

त्यानंतर, जहाजावरील एकूण १ हजार ८२७ प्रवाशांची कोविड तपासणी करून, त्यांच्या स्वॅबचे नमुने २ वैद्यकीय प्रयोगशाळेमार्फत घेण्यात आले होते. यासाठी महानगरपालिकेच्या ए विभागाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी व त्यांचे सहकारी, निमवैद्यकीय कर्मचारी, तंत्रज्ञ तसेच परिरक्षण खात्यातील अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार अशी संपूर्ण यंत्रणा कार्यरत होती. प्रवाशांची तपासणी करण्याची कार्यवाही पहाटे ५ वाजेपर्यंत सुरु होती. महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली, सहआयुक्त (परिमंडळ १), रणजित ढाकणे, ए विभागाचे सहायक आयुक्त (प्रभारी), शिवदास गुरव व त्यांचे सहकारी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. (श्रीमती) प्राजक्ता आंबेरकर यांनी आवश्यक ते सर्व नियोजन व व्यवस्था केली आहे.

बाधित रुग्णांच्या वाहतुकीसाठी १७ आसनी क्षमतेच्या ५ रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. ज्यांचे अहवाल नकारात्मक आले आहेत, अशा सर्व रुग्णांना ७ दिवस गृह अलगीकरण सक्तीचे केले आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आलेला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.