कोविड सेंटर की चोरांचा अड्डा? रुग्णाचा मोबाईल, पैसे झाले छुमंतर

या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

शहरातील कोविड सेंटरची सुरक्षा वाऱ्यावर असून, कोविड सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांच्या सामानाची चोरी होत असल्याच्या घटना घडत आहेत. गोरेगाव पूर्व येथील नेस्को कोविड सेंटरमध्ये अशीच एक चोरीची घटना समोर आली आहे. काही आठवड्यांपूर्वी नेस्को कोविड सेंटर येथे दाखल झालेल्या ६४ वर्षीय वयोवृद्ध रुग्णाजवळ असणारी रोकड, महागडे मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात केली आहे. या प्रकरणी वनराई पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू करण्यात आला आहे.

काय घडली घटना?

कांजुरमार्ग येथे राहणारे ६४ वर्षीय वयोवृद्ध इसम यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. या इसमाच्या पुतणीने त्यांना २४ एप्रिल रोजी गोरेगाव नेस्को कोविड सेंटर या ठिकाणी दाखल केले. दरम्यान कुटुंबियांनी रुग्णाजवळ मनोरंजन आणि संपर्क करण्यासाठी दोन महागडे मोबाईल, तसेच औषधांसाठी पैशांची गरज लागेल, म्हणून ३१ हजार रुपयांची रोकड रुग्णाला दिली होती.

(हेही वाचाः होम क्वारंटाईन रुग्णांना घरपोच जेवणाचे डबे पोहचवणारा अन्नदाता!)

प्राण गेले आणि वस्तूही गेल्या

२७ एप्रिल रोजी या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्रं त्यांच्याकडील वस्तू नातेवाईकांना परत मिळाल्या नाहीत. अंत्यविधी आटोपल्यानंतर नातेवाईकांनी रुग्णाजवळ असणाऱ्या सामानाबाबत चौकशी केली असता, कोविड सेंटरमध्ये त्या वस्तू मिळाल्या नाहीत. अखेर नातेवाईकांनी वनराई पोलिस ठाण्यात धाव घेऊन चोरीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, कोविड सेंटरमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने चोरीचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांचे आवाहन

कोविड सेंटर अथवा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांनी महागाड्या वस्तू अथवा रोकड सोबत ठेवण्याचे टाळावे किंवा खाजगी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांनी आणि त्यांच्याजवळील महागड्या वस्तू रुग्णालय प्रशासनाकडे जमा करुन त्याची नोंद करुन घ्यावी, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here