अतिदक्षता विभागाच्या बाहेर गर्दी करण्यास मनाई केल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी भाभा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात रुग्णाच्या तीन नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगराम वर्मा (४०) हे वांद्रे येथील भाभा रुग्णालयात कर्मचारी आहेत. शनिवारी रात्री ५ ते ६ इसम एका महिलेला जखमी अवस्थेत रुग्णालयात घेऊन आले होते. जखमी महिलेला तत्काळ अतिदक्षता विभागात हलवण्यात आले असता, डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले होते. दरम्यान या जखमी महिलेचे नातलग अतिदक्षता विभागाच्या बाहेर गर्दी करून उभे होते, त्यांना कर्मचारी जगराम वर्मा यांनी इकडे गर्दी करू नका असे सांगताच नातलगांपैकी एकाने कर्मचारी जगराम याच्या कानशिलात लगावून त्याच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली.
रुग्णालयातील इतर कर्मचाऱ्यांनी आणि सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करून जगराम याची नातलगाच्या तावडीतून सुटका करून वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी दीपक गमरे, किरण गमरे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community