हिंदु समाजातील सर्व जाती जमातींना केवळ दर्शनासाठीच नव्हे, तर गाभाऱ्यात जाऊन मुर्तीला स्पर्श करुन पूजेचा अधिकार देणारे जगातील पहीले मंदिर पतितपावन मंदीर आज विधीवत प्राणप्रतिष्ठा करुन दर्शनासाठी मुक्त करण्यात आले. मसूरकर महाराजांचे शिष्य वे.शा.सं. श्री. गणेशशास्त्री मोडक नि अन्य शिक्षित ब्राह्मण यांच्या हस्ते होम-हवन करून वेदोक्त विधीने मूर्तीस्थापनेचे कार्य फाल्गुन शुद्ध ५ शा. सं.१८५२ दिनांक २२-२-१९३१ ला यथाशास्त्र करण्यात आले. (Patitapavan Mandir)
जन्मजात जातिभेद न मानता अखिल हिंदूंना मंदिरात केवळ प्रवेशच नव्हे, तर पूजेचाही समान अधिकार असलेले पतितपावन मंदिर बांधण्याचा संकल्प सावरकरांनी दोन वर्षांपूर्वीच सोडला होता. त्याप्रमाणे भूमी घेऊन मुख्यतः श्री. भागोजीशेट कीर यांच्या आर्थिक सहाय्याने एक लाख रुपये व्यय करून हे मंदिर १९३१च्या प्रारंभी बांधून पूर्ण केले. या मंदिरात भंडारी जातीचे आणि म्हणून पूर्वपरंपरेने वेदोक्त पूजेचा अधिकार नसलेले श्रीमान भागोजी शेट करी यांच्या हस्ते वेदोक्त पद्धतीनेच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावयाची हा सावरकरांचा निर्धार होता. त्यासाठी त्यांनी काही लेख लिहिले, प्रचार केला, ठिकठिकाणी पत्रव्यवहार करून अनेक मोठमोठ्या लोकांना, तसेच मोठ-मोठ्या महार चांभार वाड्यातील अस्पृश्य लोकांना संस्थेच्या व्ययाने समारंभास आणले. भागोजींच्या आग्रहामुळे वेदोक्त पूजा सांगण्यास मान्यता दिलेले काशी, नाशिक येथील विद्वान ब्राह्मण बोलाविले. तसे जे ब्राह्मण आले त्यांचा रा. सा. रानडे यांच्या घरी उतरण्याची व्यवस्था केली. हे ब्राह्मण नि वीर सावरकर यांच्यामध्ये वेदोक्तीचा अधिकार सर्व हिंदूंना असावा की नाही, या प्रश्नावर दोन दिवस भरपूर चर्चा झाली. सावरकरांचे म्हणणे, `जो हिंदु, त्याला वेदोक्तीचा अधिकार असलाच पाहिजे, मग तो महार असो वा महाराज!’ पण सावरकरांचे हे म्हणणे शास्त्री पंडित मान्य करीनात ! आयत्या वेळी त्यांनी सांगितले की, आम्ही भंडारी जातीच्या भागोजींना, त्यांनी कितीही दक्षिणा दिली, ते कितीही सच्छील नि ईश्वरभक्त असले, तरी वेदोक्त पूजेचा अधिकार देणार नाही. शंकराचार्य डॉ. कुर्तुकोटी यांनी दिलेला निर्णयही ह्या पंडितांनी मानला नाही. तेव्हा भागोजीशेट कीरही म्हणू लागले, `ब्राह्मण नाही म्हणत असतील तर वाद कशाला ? मी ते सांगतील तशी पुराणोक्त पूजा करतो!’
(वाचा – Veer Savarkar : ‘१० फेब्रुवारी’ वीर सावरकर यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना)
त्यावरी वीर सावरकर शेटजींना म्हणाले, `शेटजी असे पहा, आपण जे मंदिर बांधले ते काहीतरी नवे तत्व सांगण्यासाठी, नाहीतर जुनी मंदिरे पुष्कळ आहेत. तेव्हा आपण अशी माघार घेत असाल, तर मी आपल्यासमवेत राहू शकणार नाही. आपणाला ठावूकच आहे की, मी जो जन्माने ब्राह्मण त्याला पुरोहित समजत नाही. तर जो हिंदू पौराहित्य जाणतो तो पुरोहित, हे माझे मत आहे. परंतु आपल्या आग्रहास्तव मी वेदोक्त पद्धतीने आपल्या हस्ते देवाची स्थापना करण्यासा, प्राणप्रतिष्ठा करण्यास, सिद्ध असलेलेही दुसरे पक्के ब्राह्मण बोलाविले आहेत. ह्या ब्राह्मणांना नाही म्हटले तरी चिंता नाही, आपण ठरल्याप्रमाणे त्यांच्या हस्ते हा समारंभ पार पाडू. मागे पाऊल घ्यायचे नाही.’ सावरकरांचा असा निर्धार पाहून कीर शेटजीही त्या अन्य ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली धार्मिक विधी करण्यास सिद्ध झाले. त्याचप्रमाणे मसूरकर महाराजांचे शिष्य वे. शा. सं. श्री. गणेशशास्त्री मोडक नि अन्य शिक्षित ब्राह्मण यांच्या हस्ते होम हवन करून वेदोक्त विधीने मूर्तीस्थापनेचे कार्य फाल्गुन शुद्ध ५शा. सं.१८५२ दिनांक२२-२-१९३१ ला यथाशास्त्र करण्यात आले.
रत्नागिरीत आल्यापासून पहिल्या वर्षात सावरकरांनी स्पर्शबंदी, दुसऱ्या वर्षी शुद्धीबंदी, तिसऱ्या वर्षी व्यवसायबंदी, चवथ्या वर्षी मंदिर प्रवेशबंदी, पुढे रोटीबंदी आणि आता वेदोक्त बंदीही मोडली. हिंदु समाजाने स्वतःच्या पायावर ठोकून घेतलेल्या ह्या स्वेदशी शृंखला एकापाठोपाठ तोडण्याचा कार्यक्रम सावरकरांनी अशा प्रकारे क्रमाक्रमाने पार पाडला.
ह्या समारंभाची जी मुद्रित निमंत्रणे पाठविली होती, ती सुद्धा नवीन सावरकरी लिपीत छापलेली आणि शुद्ध मराठीत होती. ह्या निमंत्रणाप्रमाणे ह्या समारंभासाठी परिवारासह शंकराचार्य डॉ. कुर्तुकोटी, शंभर शिष्यांसह श्री. मसूरकर महाराज, पाचलेगांवकर महाराज, गोरक्षक चौडे महाराज, गोधडे महाराज, प्रभृतिसंतमहंत, मुंबईचे ड़ॉ. ना. दा. सावरकर, डॉ. वेलकर, लालजी पेंडसे, नागपूरचे उपाध्ये, भगूरचे श्री. गोपाळराव देसाई, कोल्हापूरचे देवधर, केसरीचे प्रतिनिधी रा. गो. भिडे, गोमांतकांतील शुद्धीकृत हिंदूसह श्री. लवंदे, आर्य समाजाचे प्रचारक, चांभार पुढारी, पुण्याचे श्री. राजभोज नि मालवणचे श्री. चव्हाण, महार पुढारी पुण्याचे सुभेदार घाडगे नि पाताडे, मुंबईचे चांदोरकर नि अन्यगावच्या महार नि चांभारवाड्यातील पुढारीही ह्या समारंभाला आले होते. सर्वजण सरमिसळपणे कोणताही जन्मजात, जातिभेद न मानता एकत्र बसून समारंभ पहात होते. त्यात सहभागी होत होते दि.२१ ला देवप्रतिष्ठा करण्याचा विधी झाला नि दि.२२ ला दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांचे मुहूर्तावर शंकराचार्यांच्या हस्ते शंखचक्रगदाधारी श्रीविष्णूलक्ष्मीची– पतितपावनाची मूर्ती प्राणप्रतिष्ठित झाली. त्या वेळी जमलेल्या सर्व हिंदु समाजाने `हिंदु धर्म की जय’ ह्या निनादाने आसमंत दुमदमून गेले. मंगलवाद्ये वाजतच होती आणि मंदिराच्या कळसावर डौलाने फडकणारा कुंडलिनी कृपणांकित हिंदुध्वज सांगत होता की, आता हिंदुहिंदूत जन्मजात जातिभेद, अस्पृश्यता नि वेगळेपण मानणारी जुनी रुढी मोडली. समानतेवर आधारलेला हिंदुसमाज, समर्थ नि संपन्न नि संघटित करण्याची नवी प्रथा आता चालू झाली.
दुपारी चार वाजता मंडपात शंकराचार्य नि वीर सावरकर, पाचलेगांवकर महाराज, मसुरकर महाराज, चाडेमहाराज प्रभृतींची ह्या मंदिराचे महत्व विशद करणारी भाषणे झाली. सभा संपल्यावर मोठी मिरवणूक काढण्यात आली. पुण्याचे चांभार पुढारी श्री. राजभोज यांनी स्वहस्ते शंकराचार्यांची पाद्यपूजा केली. अस्पृश्यांना वैदिक मंदिरातील मूर्तीची पूजा करण्याचा जसा अधिकार नव्हता, त्याचप्रमाणे त्यांना शंकराचार्यांची स्वहस्ते पूजा करण्याचाही अधिकार नव्हता. तीही रूढी ह्या कार्यक्रमाने मोडली.
तिसऱ्या दिवशी अन्नसंतर्पणाचा कार्यक्रम होता. त्यासाठी सर्वांनी सरमिसळपणे पंगतीत बसावे, असे आवाहन वीर सावरकरांनी केले. परंतु या गोष्टीला शंकराचार्य, मसूरकर महाराज, पाचलेगांवकर महाराज, चौडे महाराज प्रभृति संत-मंहतांनी तसेच स्वतः कीरशेटजींनीही नकार दिला. कीर शेटजी तर परान्नही घेत नसते. अशा परिस्थितीत शेवटी सावरकरांनी सांगितले की, ज्यांना सहभोजन करायचे नाही, त्यांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे, रुढीप्रमाणे स्वतंत्र बसावे, त्यांच्या नियमांना अनुसरून त्यांना हवे तसे भोजन करावे, आमचा त्यांना विरोध नाही. त्यांनी सहभोजन करावेच, असा आग्रह नाही. पण ज्यांना जातिभेद न मानता सरसकट एका पंगतीत बसून भोजन करायचे असेल त्यांनाही तसे बसण्याची मोकळीक असावी, त्याप्रमाणे जे सहभोजनास सिद्ध होते, अशा पाचसहाशे मंडळींनी त्या अन्नसंतर्पणात भेद नमानता भोजन केले. पुढे त्यांची नावे `सत्यशोधक’ मध्ये प्रसिद्ध झाली.
अशाप्रकारे पतितपावनाच्या मूर्तिस्थापनेचा क्रांतिकारक नि हिंदुसमाजसुधारक कार्यक्रम सावरकरांनी मोठ्या निर्धाराने यशस्वी केला. पण त्यानंतर ह्या कार्यक्रमावर जेव्हा सनातनी मंडळींनी संघटितपणे निषेधाची झोड उठविली तेव्हा अनेक प्रवचनकार, पुराणिक, संतमहंत सावरकरांच्या पुरोगामीपणावर टीका करू लागले. कोणी म्हणू लागला, आम्ही सहभोजनात भाग घेतला नाही. दुसऱ्याने सांगितले, आम्ही अस्पृश्यवर्गाचा वेदोक्ताचा अधिकार मान्य केला पण अस्पृश्यांना तो देण्यास आमचा विरोध आहे. ही मंडळी अशी कच का खावूलागली? यासंबंधी सावरकर म्हणतात, `किर्तनकार पुराणिक नि प्रवचनकार हा वर्ग समाजाला पुढे ढकलणारा बहुधा केव्हाही नसतोच. तो समाजाच्या मागे मागे जाणारा. कारण त्याची उपजीविका, त्यांचे पोट समाजवर अवलंबून असते.’ (Patitapavan Mandir)
(सावरकर चरित्र – रत्नागिरी पर्व, लेखक – बाळाराव सावरकर)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community