देशभक्त क्रांतिवीर गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर
(१३ जून १८७९ – १६ मार्च १९४५)
“या स्वातंत्र्ययुद्धात जे जे योद्धे लढले, रणी पडले, त्यात काहींची नावे दोन चार दिवस लोक आठवतील, तर काहींचा लोकांना पत्ताही लागणार नाही. पण श्रेय दोघांना समान..! त्यातल्या त्यात पुतळा उभारावयाचा तर तो आपल्यासारख्या कर्मवीराचाच!” स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकरांनी असा ज्यांचा गौरव केला ते अर्थातच बाबाराव सावरकर होय.
क्रांतिकारी, अंदमानदंडित, लेखक, विचारवंत, थोर हिंदु संघटक, तरुण हिंदू सभेचे नि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक गणेश दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर यांची आज १४४ वी जयंती….
दे.भ. बाबाराव हे कुटुंबवत्सल थोरा मोठ्यांशी गप्पागोष्टी, हास्यविनोद करीत. तसेच ते शिस्तीचे मोठे भोक्ते देखील होते. सर्व गोष्टी वेळच्या वेळी घडल्याच पाहिजे. तसेच घरातील वस्तूदेखील जागच्या जागी असल्याच पाहिजेत, असा त्यांचा दंडक होता. त्यांना स्वच्छता, टापटीप आणि नीटनेटकेपणा खूप आवडत असे.
तसे तर बाबाराव सावरकर हे धार्मिक वृत्तीचे होते. योगी लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांचेवर तसे संस्कार होते. स्वतःचे कपडे स्वतः धूत आणि व्यवस्थित त्यांच्या घड्या घालून ठेवत. स्वच्छतेच्या बाबतीत घसा आणि नाक स्वच्छ ठेवण्यासाठी बाबा धौतीचा वापर करायचे. दररोज प्रातःकाळी कोठा साफ राहण्यासाठी बाबाराव नाकाने तांब्याभर पाणी प्यायचे. आंघोळीसाठी ते साबणाव्यतिरिक्त ‘वज्री’ अर्थात खडबडीत मातीने बनवलेल्या मुठीचा वापर करून अंग घासून आंघोळ करीत असायचे. त्यांच्या घरात दररोज येत असलेली वर्तमानपत्रे दिनांकवार लावून व्यवस्थित घड्या करून ते ठेवीत असत. घरातील लहानग्यांना आणि आजूबाजूच्या आपल्या मित्रांना रोज संध्याकाळी एकत्र करून बाबाराव निरनिराळ्या पौराणिक नि ऐतिहासिक गोष्टी सांगत.
एकत्र कुटुंब पद्धतीनुसार बाबांचा घरात सर्व सणवार तसेच गणेशोत्सव, नवरात्रोत्सव साजरा करण्याचा आग्रह असायचा. सर्व गोष्टीत बाबा पुढाकार घ्यायचे. क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य चळवळीत नि व्यक्तिगत जीवनात बाबांनी सुदृढ आणि बलवान तसेच शरीरयष्टीला खूप महत्त्व दिले आहे. प्रत्येक तरुणाने रोज व्यायाम करून सशक्त असायला हवे, असा त्यांचा नियम होता. बाबाराव घरातील लहान मुलांकडूनदेखील दंड, बैठका, सूर्यनमस्कार करून घेत असत. ते स्वतः प्राणायाम तसेच ध्यान धारणा करून मन एकाग्र करीत तासन् तास बसायचे.
‘सावरकर सदन’ मध्ये राहत असतांना बाबाराव सावरकर बंधूंना भेट म्हणून मिळालेली विविध पुस्तके घरातील लहान मुलांकडून गटवारीप्रमाणे लावून घेत. या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने महाभारताचे बारा खंड, संपूर्ण रामायण तसेच स्वामी विवेकानंदांची हिंदू तत्वज्ञानावरील पुस्तके, पंडित महादेवशास्त्री दिवेकर यांच्या पुस्तकांचा देखील समावेश होता. अशारीतीने बाबारावांचा धार्मिक संस्कार पाळण्याकडे नित्य कल होता. दे.भ. बाबारावांचे जीवन म्हणजे रत्नांची एक खाणच्या खाण होती.
त्या काळात जातीय तेढ विकोपाला गेल्यामुळे स्वरक्षणासाठी बाबाराव गुप्त्या, जंबिये वापरीत होते. बाबाराव बाहेर निघतांना दंड्यासारखी भासणारी गुप्ती बाळगत होते. बाबारावांनी ‘धर्म कशाला हवा’, ‘ख्रिस्त परिचय – अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व’, ‘वीरारत्न मंजुषा’, ‘वीर बंदा बैरागी’, ‘आऱ्यावरील गरुडझेप’, ‘राष्ट्रमिमांसा’, ‘हिन्दुराष्ट्र (पूर्वी-आता-पुढे)’ इत्यादी पुस्तके लिहिली. त्यातील ‘वीर बंदा बैरागी’ आणि ‘हिन्दुराष्ट्र (पूर्वी-आता-पुढे)’ ही दोन पुस्तके ब्रिटिश शासनाने जप्त केली होती.
१९२४ ते १९३७ या तेरा वर्षांच्या कालावधीत आपले लहान बंधू तात्याराव रत्नागिरी येथे स्थानबद्धतेत असताना तात्यारावांनी चालविलेली प्रत्येक चळवळ बाबारावांनी उचलून धरली. तात्यारावांच्या लेखांचा, भाषणांचा बाबारावांनी संपूर्ण देशभर विविध भाषेतून प्रचार नि प्रसार केला. जन्मजात जातीभेद मोडा, सात स्वदेशी शृंखला तोडून टाका, आपल्या भाषेत घुसलेल्या अनावश्यक परकीय शब्द बहिष्कारा, लिपित सुधारणा करा, अशा तात्यांच्या विविध उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार बाबांनी केला. बाबाराव भाषाशुद्धीचे तसेच लिपिशुद्धीचे पुरस्कर्ते होते. ते त्यांच्या लिहिण्यात, बोलण्यात परकीय शब्द वापरत नसत. एवढेच नाही तर त्यांना भेटायला आलेल्यांनाही ते स्वकीय शब्द वापरण्यास भाग पाडत. इंजेक्शनला ‘सूचीकाभरण’, बॅटरीला ‘विजेरी’, फाउंटनपेनला ‘निर्झरणी’ असे शब्द वापरत असत.
सर्वात शेवटी एक महत्त्वाचे….
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उभारणीत नि विस्तारात बाबाराव सावरकरांनी मोलाची भूमिका बजावली होती. डॉ. हेडगेवार, बाबांना आपले गुरूच मानत. बाबारावांनी स्वतःची तरुण हिंदूसभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विलीन तर केलीच, पण घरोघरी जाऊन संघासाठी निधीदेखील गोळा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एक सामर्थ्यशाली संघटन बनावे, यासाठी बाबाराव सावरकरांनी पाचलेगावकर महाराज यांचे मुक्तेश्वर दल आणि अनेक छोट्या मोठ्या संघटना संघात विलीन करवल्या. स्वतः पाचलेगावकर महाराज संघाचे प्रतिज्ञाबद्ध स्वयंसेवक झाले. संघाचे कार्य म्हणजेच हिंदूंचे संघटन! संघ शाखेवर संस्कार आणि क्षात्रतेज यांचे बाळकडू दिले जाई. तेथे वर्णभेद, जातीभेद, भाषाभेद यांना स्थान नव्हते. व्यक्तीपूजाही नव्हती. केवळ राष्ट्रवंदन आणि राष्ट्रसमर्पण ही भावना होती आणि हेच पुनरुज्जीवन स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिप्रेत होते.
आपल्या अंतिम श्वासापर्यंत बाबाराव सावरकरांनी आपले संघकार्य सोडले नाही. बाबारावांना रात्रंदिवस संघाच्या उत्कर्षाची काळजी लागलेली असायची. “हिंदुत्वाचे जे कार्य, ते आपले कार्य! हा तरुण हिंदूसभेचा बाणा आहे; तेव्हा हिंदूंच्या उत्कर्षासाठी स्थापन होणाऱ्या संघाला सभेच्या सभासदांनी सहाय्य केलेच पाहिजे, अशी बाबारावांची विचारसरणी होती. संघाच्या शाखेवर जो पहिला ध्वज लावला गेला तो डॉ. हेडगेवार यांनी बाबारावांकडून करून घेतला होता. दोन त्रिकोणाचा, भगवा असा तो संघाचा विजिगीषू ध्वज बाबारावांच्या हातून निर्माण झाला. बाबारावांनी त्याला आकार नि रंग दिला. जे हात केवळ राष्ट्रकार्यासाठी तप नि तप झिजले, त्या हातांनी संघाचा आद्य ध्वज सिद्ध झाला. ज्या हातांनी पुढे कुंडली-कृपांणांकित अखिल हिंदुध्वजाचा प्रसार केला, त्याच हातांनी संघाच्या पहिल्या झेंड्याला जन्म दिला. यात पूजनीय डॉ. हेडगेवार यांचा तरी केवढा समर्पकपणा ! त्यांनी एखाद्या अलबत्या गलबत्या माणसाकडून आपल्या संघाचा आद्य ध्वज करून न घेता तो बाबाराव सावरकरांसारख्या कष्टभोगी, त्यागी देशभक्ताकडून करवून घेतला. डॉ. हेडगेवार यांनी ध्वजाप्रमाणेच संघाची प्रतिज्ञाही बाबाराव सावरकरांकडून लिहून घेतली. तसे तर बाबारावांनी पूर्वी अभिनव भारत आणि तरुण हिंदूसभेची प्रतिज्ञा सिद्ध केलेली होती. त्यात शाब्दिक फेरफार करून डॉ. हेडगेवार यांनी ती स्वीकृत केली.
बाबा मृत्युशय्येवर असतांनादेखील जेव्हा गोळवलकरगुरुजी बाबारावांना भेटायला गेले, तेव्हाही संघाचे काम कसे वाढेल हाच विचार बाबांच्या मनात येत होता.
अशा या कर्मयोगी, तपस्वी ऋषिला त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन..!
• संदर्भ :-
आठवणी अंगाराच्या
– विश्वासराव विनायकराव सावरकर
क्रांतिवीर बाबाराव सावरकर
– द. न. गोखले
नित्य सावरकर विचारदर्शन
– संकलन/निरूपण : कै. हिमानीताई अशोकराव सावरकर
लेखक – शिरीष शरद पाठक, नाशिक.
मो.: ९९७५९ १३१०१