गणरायाच्या आगमनाला दोन दिवस उरलेले असताना राज्यात मोठ्या प्रमाणावर मोरपिसांची विक्री सुरु आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्यातून मोरपिसे महाराष्ट्रात विक्रीसाठी आणली जात असल्याचा आरोप सातारा वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी केला.
या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी प्राणीप्रेमींनी राज्याच्या वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्याकडे केली आहे. देशाचा राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करून पक्ष्याच्या पिसांची छाटणी केली जात असल्याची भीती प्राणीप्रेमी व्यक्त करत आहेत. त्यामुळे मोराच्या शिकारीला आळा घालण्यासाठी संरक्षणात्मक तरतुदी केल्या जाव्यात, अशी मागणी जोर धरली जात आहे.
मोरपिसांच्या विक्रीसाठी मोरांची शिकार होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. राष्ट्रीय पक्ष्याला वाचवण्यासाठी केंद्रीय वने, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्रालयाच्या मंत्र्यांना वनविभागाच्या वन्यजीव विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी पत्र लिहावे. जेणेकरून मोरपिसांच्या विक्रीला बंदी येईल. या मागणीसाठी मी राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांना पत्र लिहिले आहे.
– रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा वनविभाग.
असे पसरले आहे शिकाऱ्यांचे जाळे
राज्यात मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमधील गोल देऊळ गुलालवाडी, पुण्यात तुळशी बाग, भोरी अली, उंठखान्यातील चुन्नाभट्टी या परिसरात मोठ्या प्रमाणात मोरपिसांची विक्री होत आहे. या परिसरात मोरपीस विकणारे प्रामुख्याने उत्तर प्रदेश, राजस्थान राज्यातील रहिवासी आहेत. मोरपीस विक्रेत्यांना आग्रा, मथुरा, जयपूर राज्यातील माणसांकडून मोरपीस विकण्यासाठी दिले जातात.
शिकारीची दाट शक्यता असण्यामागील कारण
एक मोर वर्षातून स्वतःहून 150 ते 200 मोरपीस शरीरातून काढतो. निसर्गात मोराच्या शरीरातून निघालेल्या मोरपिसाच्या विक्रीसाठी परवानगी आहे. बाजारात मोरपिसांची संख्या पाहता शिकारीची शक्यता जास्त आहे. मोराची शिकार केल्यानंतर छाटलेल्या मोरपिसावर एक विशिष्ट प्रकारचे रसायन टाकले जाते जेणेकरून रक्त पूर्णपणे निघून जाईल.
Join Our WhatsApp Community