मुंबई महापालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांची ‘पेन्शन अदालत’ ८ ऑगस्टला होणार

138

महानगरपालिकेच्या निवृत्त कर्मचा-यांसाठी ‘पेन्शन अदालत’ भायखळा येथे दर महिन्याच्या दुस-या मंगळवारी ‘पेन्शन अदालत’ घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. परंतु या महिन्यात दुस-या मंगळवारी सुट्टी असल्याने ‘पेन्शन अदालत’ सोमवारी होणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

(हेही वाचा – Indian Railways Rule: देशातील अशी पहिली ट्रेन ज्यामध्ये नॉन व्हेज Not Allowed!)

महापालिका निवृत्ती वेतनधारकांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, यादृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सोमवार, दिनांक ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत ‘उच्चस्तरीय पेन्शन अदालत’ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख लेखापाल (कोषागार), प्रमुख लेखापाल (कोषागार) यांचे कार्यालय, मुंबई महानगरपालिका, ई-विभाग कार्यालय इमारत, तिसरा मजला, शेख हफीजुद्दीन मार्ग, भायखळा (पश्चिम), मुंबई – ४००००८ याठिकाणी ही पेन्शन अदालत भरणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख लेखापाल (कोषागार) यांनी दिली आहे.

(हेही वाचा – Har Ghar Tiranga: घरी तिरंगा फडकवायचाय? मग असा हवा झेंड्याचा आकार)

महानगरपालिकेतील निवृत्ती वेतनधारक त्यांच्या विविध समस्यांकरिता सतत महानगरपालिका आयुक्त कार्यालयाशी पत्रव्यवहार करतात, त्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी महानगरपालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्याकडे दर महिन्याच्या दुस-या मंगळवारी ‘उच्चस्तरीय पेन्शन अदालत’ सुरु करण्यात आली आहे. निवृत्ती वेतनधारकांचे प्रश्न मार्गी लावावेत, हा या ‘पेन्शन अदालती’चा प्रमुख उद्देश आहे. या ‘पेन्शन अदालत’मध्ये प्रमुख लेखापाल (कोषागार) यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख कर्मचारी अधिकारी व उप कायदा अधिकारी यांची त्रिसदस्यीय समिती पेन्शनधारकांची सर्व गा-हाणी ऐकून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे. परंतु, या ऑगस्ट महिन्यातील दुस-या मंगळवारी म्हणजेच दिनांक ०९ ऑगस्ट, २०२२ रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने सदर अदालत सोमवार, दिनांक ०८ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या अदालत मध्ये ज्या प्रकरणांचा सहाय्यक महानगरपालिका आयुक्त / खाते प्रमुख / अधिष्ठाता यांच्या स्तरावर निवृत्ती वेतनधारकांच्या समस्यांचे निराकरण झालेले नाही, अशाच प्रकरणांचा समावेश करण्यात येणार आहे. सहाय्यक महानगरपालिका आयुक्त / खाते प्रमुख / अधिष्ठाता कार्यालयात विहित नमुन्यात अर्ज सादर केलेले निवृत्ती वेतनधारक या पेन्शन अदालतीमध्ये थेट उपस्थित राहू शकणार आहेत. या ‘पेन्शन अदालत’ मध्‍ये मुंबई महानगरपालिकेच्या ज्या निवृत्त वेतनधारकांच्या निवृत्ती वेतना संबंधीच्या समस्‍या सुटलेल्‍या नाहीत, त्‍यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.