भारताची आर्थिक प्रगती झपाट्याने होतेय, जीडीपी वाढतोय. त्यामुळे येत्या काळात जगातील पहिल्या तीन महासत्तांत आपला समावेश झाल्यास नवल वाटायला नको. कारण युवा शक्ती ही भारताची मोठी ताकद आहे. पण, माझ्यामते भारत जगातील पहिल्या क्रमांकाची महासत्ता झाला तरी, ते पुरेसे नाही. प्रत्येक नागरिकाचे दरडोई उत्पन्न जगातील पुढारलेल्या देशांइतपत होईल, तेव्हाच आपण प्रगतीचा टप्पा गाठला, असे म्हणता येईल, असे मत ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
गर्जे मराठी या सेवाभावी संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तथा मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, गर्जे मराठीचे संस्थापक आणि अध्यक्ष आनंद गानू, सहसंस्थापक संजीव ब्रह्मे आदी उपस्थित होते.
तंत्रज्ञान विकासाची दरी वाढतेय
काकोडकर म्हणाले, भारताचे सकल उत्पन्न अमेरिकेइतके झाले, तरी इथल्या लोकसंख्येशी तुलना करता ते एक सप्तमांशापेक्षाही कमी असेल, याचाही विचार व्हायला हवा. काळाशी स्पर्धा करत जी राष्ट्रे पुढे जात आहेत, त्यात विज्ञानाचा महत्वाचा वाटा आहे. पुढारलेल्या देशातील तंत्रज्ञानाच्या गतीशी भारताची तुलना केल्यास, आपण मागे आहोत हे सकृतदर्शनी दिसून येईल. किंबहुना तंत्रज्ञानातील विकासाची दरी पुढारलेल्या देशांच्या तुलनेत भारतात वाढत आहे. जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या भारतात असली तरी आपण तांत्रिक महाशक्ती होऊ शकलेलो नाही. त्यामागील कारणे शेवटी शिक्षणाकडे येऊन थांबतात, असेही काकोडकर म्हणाले.
श्रमप्रतिष्ठेला महत्व मिळायला हवे!
नोकरी मिळाली की स्थैर्य मिळते, अशी समजूत तरुणांत वाढत आहे. ग्रामीण भागांतील तरुणांचा कल शहरांकडे अधिक आहे. त्यांना त्यांच्या गावी नोकरी देण्याची व्यवस्था केली तर कदाचित नकार देतील. पण तीच शहरात मिळाली, तर आनंदाने स्वीकारतील. त्याला सामाजिक मानसिकता कारणीभूत आहे. श्रमप्रतिष्ठेला जितके महत्व यायला हवे, तितके अद्याप आलेले नाही. आपल्याकडचा माणूस अमेरिकेत शिक्षणासाठी गेला आणि तेथे पैशांसाठी कॅफेमध्ये भांडी घासावी लागली तरी तो ते निमुटपणे करेल. पण भारतात हे काम करणे त्याला प्रतिष्ठित वाटणार नाही. त्यामुळे गर्जे मराठीसारख्या संस्थांनी श्रमप्रतिष्ठेच्या बाबतीतही मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे काकोडकर म्हणाले.
…तर भयानक स्थिती निर्माण होईल
भारताची आर्थिक परिस्थिती सुधारतेय, तशी आर्थिक तफावतही वाढत आहे. ती ठराविक स्तराच्या वर गेली, तर भयानक स्थिती निर्माण होईल. त्यामुळे ही तफावत कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी ग्रामीण भागातील उत्पन्न वाढणे गरजेचे आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील दरी मिटवली, तरी ही तफावत कमी होईल. प्रत्येक गाव निर्यातक्षम झाल्यास ग्रामीण-शहरी दरी मिटवता येईल. ग्रामीण भागांत शेती किंवा शेतीपुरक व्यवसाय वाढवून चालणार नाही. तर तंत्राधारित व्यवसायांना चालना द्यावी लागेल. ग्रामीण भागातील शिक्षणाची व्यवस्था शहराच्या तोडीस निर्माण झाली, तर तिथले तरुण शहरी भागातील तरुणांसारखे सक्षम होतील. त्यामुळे आर्थिक प्रगती जलदगतीने साधता येईल, असे मतही काकोडकर यांनी व्यक्त केले.
Join Our WhatsApp Community