सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परीक्षेसाठी (सेट) विद्यापीठ अनुदान आयोगाकडून परवानगी प्राप्त झाली असून परीक्षेची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी आयोगाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
(हेही वाचा – पर्यावरणपूरक बांबूपासून बनलेले कंदील खरेदी करण्याची पालघर जिल्हातील आदिवासी महिलांची साद)
विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या मान्यतेने राज्य शासनाच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा आयोजित करते. ही परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी विद्यार्थी तसेच अनेक विद्यार्थी संघटना यांनी निवेदन दिले होते. मात्र परीक्षा घेण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता गरजेची असल्याने ही मान्यता मिळविण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील होते.
विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी नवी दिल्ली येथे अनुदान आयोगाच्या कार्यालयात भेट देत मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर काहीच दिवसात आयोगाने ही मान्यता दिली असून आता विद्यापीठ पातळीवर परीक्षेच्या नियोजनाची तयारी सुरू झाली आहे.
लवकरच विद्यापीठाकडून पात्रता परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येईल असे विद्यापीठाचे कुलसचिव व सेट परीक्षेचे सदस्य सचिव डॉ.प्रफुल्ल पवार यांनी सांगितले. तसेच मागील वर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येईल असेही डॉ. पवार यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community