काही माणसे कधी कुणाला हातोहात फसवतील त्याचा थांगपत्ता लागणार नाही. नवी मुंबईतील खारघर येथील एका मोठ्या हॉटेलात एक व्यक्ती तिच्या मुलाला घेऊन तेथील डीलक्स रूम मध्ये ८ महिने राहत होती. त्या दरम्यान जीवाची मुंबई केली. हॉटेलातील राजेशाही थाट उपभोगून घेतला. हॉटेल व्यवस्थापनाला मात्र ती व्यक्ती बिल कधी भरणार, अशी रुकरुक लागली होती. शेवटी न राहून व्यवस्थापनाने संबंधित व्यक्तीला ‘बिल कधी भरणार’, अशी विचारणा केली, तर पठ्ठ्याने लागलीच ‘महिनाभरात भरतो’, असे सांगितले. परंतु दुसऱ्याच दिवशी ती व्यक्ती हॉटेलातून पसार झाली.
तब्बल २५ लाख रुपये झाले बिल!
आरोपी मुरली कामत हा त्याच्या १२ वर्षांच्या मुलाला घेऊन गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी हॉटेलमध्ये राहिला आला होता. त्याने दोन डीलक्स रूम बूक केले होते. एका रुममध्ये मुरली आणि त्यांचा मुलगा राहत होता आणि दुसरी रूम त्याने खास मिटिंगसाठी ठेवली होती. तब्बल ८ महिने राहिल्यानंतर मुरली कामत हा हॉटेलातील बाथरूमच्या खिडकीतून पळून गेला. त्याचे थोडेथोडके नाही, तर तब्बल २५ लाख बिल झाले आहे. मुरली कामत हा मूळचा अंधेरी येथील राहणारा आहे. त्याने हॉटेलमध्ये स्वत:ची ओळख स्पष्ट करण्यासाठी पासपोर्ट जमा केला होता.
चित्रपटसृष्टीत काम करत असल्याचे सांगितले!
मुरली याने तो चित्रपट क्षेत्रात काम करीत असल्याचे हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगितले होते. आरोपीने त्याचा मोबाईल, लॅपटॉप रुममध्येच सोडला आहे. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापनाने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Join Our WhatsApp Community