मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये फिरत आहेत ‘सिरीयल मॉलेस्टर’

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये विकृत चाळे करून महिलांना छेडणारे इसम मोठ्या प्रमाणात फिरत आहेत. हे इसम शाळकरी मुली आणि कॉलेज तरुणींना आपले लक्ष्य करीत असल्याचे ‘सीएसएमटी’ रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन घटनांवरून समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी या दोन्ही घटनांमधील दोघांना अटक केली असून, या प्रकारची विकृती असणारे अनेक जण रेल्वेत फिरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विकृताचे काॅलेज तरुणींसमोर चाळे

मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये दुपारच्या वेळी प्रवाशांची संख्या कमी असते. दुपारच्या वेळेस शाळकरी आणि कॉलेज विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. अशा वेळी लोकल ट्रेनच्या महिलांच्या डब्ब्यात विकृत प्रवृत्ती असलेले काही जण चढून शाळकरी मुली तसेच कॉलेज तरुणींसमोर विकृत चाळे करून त्यांना छेडण्याचा प्रयत्न करतात. गेल्या आठवड्यात या प्रकारच्या दोन घटना भायखळा ते सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडल्या आहेत. एका घटनेत कल्याण येथे राहणाऱ्या १५ वर्षांच्या दोन मैत्रिणी दुपारच्या वेळी दादर ते सीएसएमटी प्रवास करत असताना, 30 वर्षांचा एका तरुण भायखळा रेल्वे स्थानकात या दोन तरुणी असलेल्या डब्ब्यात शिरला. या दोघी दारात उभ्या असताना, हा विकृतदेखील त्यांच्या शेजारी जाऊन उभा राहिला. घाबरून या दोघी सीटवर जाऊन बसल्या असता, हा इसम त्यांना अश्लील इशारे करू लागला. सीएसएमटी स्थानक येताच या दोघी घाबरत ट्रेन मधून उतरल्या. त्यानंतर या इसमाने दोघींचा पाठलाग केला. घाबरलेल्या या दोघींनी स्थानकावर असलेल्या पोलिसांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी धावत इसमाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
या मुलीच्या तक्रारीवरून त्याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. असाच काहीसा प्रकार दोन दिवसांपूर्वी मस्जिद बंदर या ठिकाणी घडला. मस्जिद बंदर स्थानकावर असलेल्या पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सलमान ताजुउद्दीन सय्यद (१९) आणि गोपी मधु बोये (३५) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, सलमान हा मुंब्रा तर बोये हा सीएसएमटी परिसरात फुटपाथवर राहतो. अशी माहिती सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी दिली. या प्रकारे अनेक विकृत प्रवृत्तीच्या व्यक्ती लोकल ट्रेनमध्ये फिरत असल्याचे समजते. या विकृताचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर धावत्या ट्रेनमध्ये एखादी मोठी घटना घडू शकते, याची शक्यता नाकरता येत नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here