महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या दिवशी झालेल्या सभेनंतर मशिदीवर लावण्यात आलेल्या भोंग्यांवरून राजकारण सुरू झाले आहे. राज्यात असलेल्या धार्मिक स्थळावर जवळपास ३ हजार बेकायदेशीर भोंगे लावण्यात आलेले असून एकट्या मुंबईत धार्मिक स्थळावर एक हजारापेक्षा अधिक भोंगे बेकायदेशीर असल्याची धक्कादायक माहिती याचिकाकर्ते संतोष पाचलग यांनी दिली आहे. ही आकडेवारी केवळ ४० टक्के असल्याचे पाचलग यांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले.
( हेही वाचा : MPSC मध्ये ८ हजार पदांची मेगा भरती! )
… तर हनुमान चालीसा लावण्यात येईल
राज्यात मागील काही दिवसांपासून धार्मिक स्थळावर लावण्यात आलेल्या भोंग्यावरून राजकारण तापत चालले आहे. गुडीपाडव्याच्या सभेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यात आले नाही तर प्रत्येक मंदिरावर भोंगे लावून हनुमान चालीसा सुरू करू असा इशारा सरकारला दिला होता. मंगळवारी राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या सभेत तर सरकारला अल्टिमेटम दिला असून ३ मे पर्यत हे भोंगे उतरवले गेले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात मंदिरावर भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा सरकारला दिला आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक स्थळे आहेत, त्यापैकी सर्वात अधिक प्रमाणात मशिदींवर बेकायदेशीर भोंगे लावण्यात असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले होते. महाराष्ट्रात २९४० धार्मिक स्थळांवर बेकायदेशीर भोंगे लावले आहेत, त्यापैकी सर्वात अधिक भोंगे म्हणजे १७६६ मशिदींमध्ये लावले आहेत. समाजसेवक संतोष पाचलग यांनी या बेकायदेशीर भोंग्याविरुद्ध आवाज उठवला होता.
पुढच्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता
संतोष पाचलग यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २०१६ मध्ये उच्च न्यायालयाने धार्मिक स्थळावर असलेले बेकायदेशीर भोंगे काढण्याचे आदेश तत्कालीन सरकारला दिले होते. राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशावरून किती बेकायदेशीर भोंगे काढले याबाबत २०१८ मध्ये माहितीच्या अधिकारातून याचिकाकर्ता संतोष पाचलग यांनी माहिती मागवली होती. त्यात महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात लावण्यात आलेल्या बेकायदा लाऊडस्पीकरची माहितीही मागवण्यात आली होती. संपूर्ण महाराष्ट्रात २९४० लाऊडस्पीकर धार्मिक स्थळांवर बेकायदेशीरपणे लावण्यात आल्याची माहिती प्रशासनाने त्यांना माहिती अधिकारातून दिली. त्यापैकी १७६६ भोंगे फक्त मशिदी, दर्गे आणि मदरशांमध्ये लावण्यात आले आहेत. याशिवाय मंदिरात १०२९ भोंगे, चर्चमध्ये ८४ भोंगे, गुरूद्वारांमध्ये २२ आणि बुद्ध विहारांमध्ये ३९ भोंगे बेकायदेशीरपणे लावण्यात आले आहेत अशी माहिती समोर आली आहे. एकट्या मुंबईत धार्मिक स्थळावर अजूनही ९०० भोंगे बेकायदेशीर आहेत. ही आकडेवारी केवळ ४० टक्के असून कारण ६० टक्के डाटा पोलिसांकडे नसल्याचे याचिकाकर्ते संतोष पाचलग यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ला सांगितले. एकट्या मुंबईतील धार्मिक स्थळावरील बेकायदेशीर भोंग्याची आजची परिस्थिती जाणून घेतली तर दोन हजारापेक्षा अधिक भोंगे लावले आहेत. त्यापैकी सर्वात अधिक भोंगे केवळ मशिदीवर लावले असल्याची शक्यता संतोष पाचलग यांनी व्यक्त केली.
सरकारने न्यायालयाचे आदेशाचे पालन केले नसल्यामुळे २०१८ मध्ये पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली असून पुढच्या आठवड्यात या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे याचिकाकर्ते संतोष पाचलग यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community