निवडणूक काळातील साडेचार महिन्यांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या दर स्थिरतेनंतर २२ मार्चपासून पुन्हा इंधन दरवाढ सुरू करण्यात आल्याचे दिसतेय. इंधन दरवाढीचे सत्र कायम असून, गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलदरात प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली़ त्यामुळे गेल्या दहा दिवसांत इंधन ६ रुपये, ४० पैशांनी महागल्याचे दिसून आले. तर मुंबईत पेट्रोल प्रतिलिटर ११६. ७२ रुपये आणि डिझेल १००. ९४ रुपयांवर पोहोचले. दिल्लीत पेट्रोल १०१. ८१ रुपये, तर डिझेल ९३. ०७ रुपयांवर पोहोचले आहे.
या राज्यात पेट्रोल 100 रुपयांपेक्षा महाग
गेल्या दहा दिवसांत पेट्रोल-डिझेलदरात वाढ झाली असून या कालावधीत इंधनदरात सुमारे साडेसहा रुपयांनी वाढ झाल्याने महागाईत आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत. २२ मार्चनंतर केवळ २४ मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या दहा दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल ६.८४ रुपयांनी महाग झाले आहेत. नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे १०० रुपयांपेक्षा अधिक आहेत.
(हेही वाचा – गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वीजग्राहकांना मिळणार गोड बातमी! )
एअर टर्बाइन इंधनाच्या किमतीत दोन टक्क्यांनी वाढ
सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी एअर टर्बाइन इंधन (ATF) च्या किमतीत २२५८.५४ रुपये प्रति किलोलीटर किंवा दोन टक्के वाढ केली. या वाढीनंतर एटीएफची किंमत १,१२,९२४.८३ रुपये प्रति किलोलीटर झाली आहे. मात्र, आज सलग सात दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केल्यानंतरही तेल विपणन कंपन्यांनी या दोन्ही वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल केला नाही, ही दिलासादायक बाब आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे सरकारी तेल विपणन कंपन्यांना एटीएफच्या किमतीत वाढ करावी लागली आहे. यावर्षी १ जानेवारीपासून एटीएफच्या किमतीत सात वेळा वाढ करण्यात आली आहे.