या सुविधेमुळे, भारताच्या तेल उत्पादनात प्रतिदिन ६ हजार बीबीएलएस वाढ होण्याची अपेक्षा – हरदीप सिंह पुरी

85

ओएनजीसीच्या ‘सागर सम्राट’ या सुप्रसिद्ध तेल उत्खनन जहाजाचे मोबाईल ऑफशोअर उत्पादन युनिट (MOPU) म्हणून पुनर्राष्ट्रार्पण करण्यात आले. या अत्याधुनिक सुविधेत २० हजार BPD कच्चे तेल हाताळण्याची क्षमता आहे. तसेच, कमाल निर्यात गॅस क्षमता दरदिवशी २.३६ एमसीएम इतकी असेल. यामुळे येत्या काही दिवसांत भारताच्या तेल उत्पादनात प्रतिदिन ६ हजार बीबीएलएस तेलाची भर पडेल, अशी अपेक्षा केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी व्यक्त केली आहे.

तेल उत्खनन करण्याच्या नव्या संधी यातून खुल्या होणार

सागर सम्राटचे पुनर्राष्ट्रार्पण म्हणजे आजच्या अनिश्चिततेच्या आणि निसर्गातील चढउतारांच्या काळात, पुनर्रेखन आणि अभिनव प्रयोगांच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटवण्याचे धाडस आणि तीव्र इच्छाशक्ती यांचा प्रत्यक्ष पुरावाच असल्याचे ते म्हणाले. या संदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये पुरी यांनी म्हटले आहे, “आता मोबाईल ऑफशोअर उत्पादन युनिट` या नावाने सागर सम्राट सागरावर राज्य करत आहे. काल या ओएनजीसी इथे ऊर्जा सैनिकांसोबत देशाच्या मौल्यवान संपत्तीला पुन्हा राष्ट्राला अर्पण करण्याच्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. सागर सम्राट १९७३ साली तयार करण्यात आले. या जहाजाद्वारे आजपर्यंत १४ महत्वाच्या सागरी, तेल आणि वायू संशोधन केले असून, १२५ तेल विहिरी खोदल्या आहेत. १०४७ पर्यंत ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने सुरू असलेल्या भारताच्या सातत्यपूर्ण प्रवासातील हे एक सकारात्मक पाऊल आहे असे म्हणता येईल. हे युनिट खोल पाण्यात काम करण्यास सक्षम असेल, तसेच आजपर्यंत न वापरलेल्या साठ्यांमधून तेल उत्खनन करण्याच्या नव्या संधी यातून खुल्या होतील, असेही हरदीप पुरी यांनी सांगितले.

सागर सम्राटने जागतिक तेलाच्या नकाशावर भारताचे नाव कोरले

१९७३ मध्ये कार्यान्वित झालेल्या सागर सम्राटने जागतिक तेलाच्या नकाशावर भारताचे नाव कोरले. गेल्या ३२ वर्षांत सागर सम्राटने जवळपास १२५ विहिरी खोदल्या आहेत आणि भारतातील १४ प्रमुख ऑफशोअर तेल आणि वायू संशोधनात या युनिटचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. सुरुवातीला जॅक-अप ड्रिलिंग विहीरची सुविधा असलेले, सागर सम्राट आता मोबाईल ऑफशोअर प्रोडक्शन युनिट (MOPU) मध्ये रूपांतरित झाले आहे. ब्रिटीश अभियांत्रिकी आणि सल्लागार समूह वुड ग्रुपच्या टेक्सास स्थित मस्टँग युनिटने या जहाजाचे फ्रंट-एंड अभियांत्रिकी काम केले आहे.

ज्यामुळे या भागातील उत्पादन वाढेल

एमओपीयू सागर सम्राटने उत्पादन २३ डिसेंबर २०२२ रोजी सुरू केले. आज हे जहाज, सध्या मुंबईच्या पश्चिमेला १४०-१४५ किलोमीटर अंतरावर असलेल्या पश्चिम समुद्रात (WO)-१६ फील्डवर तैनात आहे. ओएनजीसीच्या सध्याच्या WO-१६ वेल हेड प्लॅटफॉर्म (WHP)च्या शेजारी ७६ मीटर खोल पाण्यात हे जहाज पश्चिम समुद्रात क्लस्टरमधील सीमांत क्षेत्रांमधून उत्पादन करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. ज्यामुळे या भागातील उत्पादन वाढेल. एमओपीयूची रचना दररोज २० हजार बॅरल कच्च्या तेलाची हाताळणी करण्यासाठी केली गेली आहे आणि त्याची कमाल निर्यात गॅस क्षमता दररोज २.३६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.

..म्हणून सागरी तेल उत्खनन प्रकल्पाचे पुनर्राष्ट्रार्पण केले

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी शनिवारी मुंबईत सागर सम्राट इथे झालेल्या एका कार्यक्रमात ओएनजीसी म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळाच्या महत्वाकांक्षी सागर सम्राट या मुंबईच्या पश्चिम सागरी किनाऱ्यापासून १४०-१४५ किमी दूर असलेल्या सागरी तेल उत्खनन प्रकल्पाचे, ‘मोबाईल ऑफशोअर उत्पादन विभाग’ (MOPU) म्हणून पुनर्राष्ट्रार्पण केले. यावेळी ओएनजीसीचे अध्यक्ष, अरुण कुमार सिंह आणि पेट्रोलियम सचिव, पंकज जैन देखील उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पुरी यांनी ओएनजीसीच्या केंद्रीय विद्यालय, पनवेल फेज २ इथल्या कार्यालयात जाऊन, ओएनजीसीचे ऊर्जा सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.

हरदीप पुरी यांनी सागर सम्राट या उत्खनन विहिरीचा कार्यभार सांभाळणाऱ्या ओएनजीसी च्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. तसेच या प्रकल्पाला एमओपीयुमध्ये रुपांतरित करणाऱ्या चमूचीही त्यांनी भेट घेतली. त्यांनी ओएनजीसीच्या ऊर्जा सैनिकांना भारताच्या ऊर्जासुरक्षेसाठी पुढेही काम करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच, हरदीप पुरी यांनी असेही अधोरेखित केले की, सागर सम्राट ही भारताच्या स्वतःचे तेल उत्खनन करण्याच्या दूरदृष्टीचे समर्पक उदाहरण आहे. भारताला जेव्हा जगाने, हायड्रोकार्बन उत्खनन क्षेत्रातील ‘वैराण’ भूमी म्हणून हिणवले जात होते, अशा वेळी भारताने स्वतःचे तेल उत्खनन करण्याचा निर्णय घेतला, हे महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

भारताचे उत्खनन क्षेत्र २०२५ पर्यंत ०.५ दशलक्ष चौरस किमीपर्यंत वाढवण्याचा तसेच, २०३०पर्यंत १.० दशलक्ष चौ. किमी. पर्यंत वाढवण्याचा भारत सरकारचा मानस आहे, असेही केंद्रीय मंत्री यावेळी म्हणाले. आता ‘जाण्यास शक्य नाही’ असा भाग ९९ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे, ज्यामुळे खूप अतिरिक्त जागा आता मोकळी झाली आहे. त्यातून भारताच्या EEZ चे अतिरिक्त सुमारे १ दशलक्ष चौ.कि.मी. अन्वेषणासाठी उपलब्ध झाले आहे. शेवरॉन, एक्सॉनमोबिल आणि टोटल एनर्जी सारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या भारतीय ऊर्जा आणि पेट्रोलियम विभागात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत आणि काही कंपन्या परस्पर फायदेशीर भागीदारी मजबूत करण्यासाठी ओएनजीसीसोबत आधीच बोलणी करत आहेत.

(हेही वाचा – अभिमानास्पद! भारतातील तरुणांच्या आत्महत्या प्रतिबंध राष्ट्रीय सल्लागार परिषदेत महाराष्ट्राच्या तरुणाची निवड)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.