राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केलेल्या कारवाईत अनेक गोष्टींचा खुलासा झाला आहे. महाराष्ट्र एटीएसला औरंगाबादमधून अटक केलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. मराठवाड्यात शारीरिक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे एटीएसच्या समोर आले आहे.
ATS आणि NIA ने काही दिवसांपूर्वी PFI च्या कार्यालयांवर धाडी टाकल्या होत्या. दोन टप्प्यांत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनेक PFI च्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तसेच, त्यांच्या कार्यालयातून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. या कारवाईनंतर केंद्र सरकारने पीएफआयवर पाच वर्षांसाठी बंदी घातली. एनआयएने केलेल्या कारवाईत महाराष्ट्र एटीएसचा सहभाग होता. एटीएसच्या तपासात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा: मुख्यमंत्र्यांना धमकीचे प्रकरणः एकाला अटक,कोणी आणि का केला फोन? )
या ठिकाणी दिले जाते दहशतवादाचे ट्रेनिंग
औरंगाबादमधील पडेगाव, नारेगावसह बीड आणि जालना येथे शारिरीक प्रशिक्षणाच्या नावाखाली दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे एटीएसला आढळले आहे. त्याशिवाय, अटकेत असलेल्या आरोपींच्या वेगवेगळ्या बॅंक खात्यातून अनेक मोठे आर्थिक व्यवहार झाल्याचा दावाही एटीएसने न्यायालयात केला आहे.
रविवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश एन.एल. मोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. शेख इरफान शेख सलीम उर्फ मौलाना इरफान मिल्ली, सय्यद फैजल सय्यद खलील, परवेज खान मुजम्मील खान, अब्दुल हादी अब्दुल रऊफ आणि शेख नासेर शेख साबेर अशी आरोपींची नावे आहेत. तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईत आरोपींचे मोबाईल, लॅपटाॅप, हार्ड डिस्क जप्त करण्यात आले होते. त्यातून एटीएसला महत्त्वाच्या बाबी समजल्या आहेत.
Join Our WhatsApp Community