हॉटेलच्या खोलीत मुलासह कॉरंटाईन करण्यात आलेल्या महिलेचा हॉटेलच्या कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील अंधेरी पूर्व येथे घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करत हॉटेल कर्मचाऱ्याला अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कॉरंटाईन मुक्त करण्याचे सांगत काढली छेड
पीडित महिला ही पनवेल येथे राहणारी आहे. या महिलेच्या पतीला आणि सासूला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यामुळे, त्यांना पनवेलच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान या महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे, तिला अंधेरी पूर्व येथील एका हॉटेलमध्ये मुलांसह कॉरंटाईन करण्यात आले होते. कॉरंटाईन असणाऱ्या व्यक्तीची औषधे तसेच खाण्यापिण्याच्या व्यवस्थेसाठी हॉटलेच्या कर्मचाऱ्यांची, मेडिकल कॉर्डिनेटर म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती. पीडित महिलेला आणि तिच्या मुलांना कॉरंटाईन मुक्त करण्यासाठी हॉटेलच्या मेडिकल कॉर्डिनेटर असणाऱ्या कर्मचाऱ्याने, तिला मिठी मारण्याची विनंती करत तिच्या हाताचे चुंबन घेऊन तिची छेड काढली.
(हेही वाचाः आयआयटी मुंबईला कोरोनाचा विळखा! कॅम्पसमधील रुग्णालय भरले!)
कर्मचा-याला न्यायालयीन कोठडी
या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने या कर्मचाऱ्याला खोलीतून बाहेर काढून, दार बंद करून घेतले. त्यानंतर महिलेने मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करुन सदर माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांनी हॉटेलवच्या ठिकाणी धाव घेऊन पीडित महिलेची भेट घेऊन, तिची तक्रार दाखल केली. हॉटेल कर्मचारी याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन, त्याला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
Join Our WhatsApp Community